– विवेकानंद काटमोरे
हडपसर (प्रतिनिधी) – राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी एक सदस्यीय प्रभाग जाहीर केला आहे. ही एक सदस्यीय प्रभाग रचना जाहीर झाल्यावर हडपसर विधानसभा मतदार संघातील सर्वपक्षीय प्रमुखांनी स्वागत केले आहे.
या रचनेचा सर्वाधिक फायदा आम्हालाच होईल ,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला असून भविष्यात राज्यसरकारकडून राष्ट्रवादी काँग्रेसने द्विसदस्यीय तर भाजपने बहुसदस्यीय प्रभाग रचनेची अपक्षा केली आहे.
हडपसर विधानसभा मतदार संघातील पक्षांच्या प्रमुखांनी दैनिक प्रभात शी बोलताना आपली मते मांडली आहेत.
(१) या निर्णयाच आम्ही स्वागतच करतो .या निर्णयामुळे प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळतो. याशिवाय एक सदस्य प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकाला येथे काम करण्यास सोपे जाते त्याचे काम दिसते. सन २००७ च्या निवडणूक ही एक सदस्य वॉर्डातून झाली होती, त्यावेळी शिवसेनेचे सर्वाधिक २१ नगरसेवक महानगरपालिकेत निवडून आले होते. यावेळीही त्याचा शिवसेनेला नक्कीच फायदा होईल.
– समीर तुपे (उपशहर प्रमुख- शिवसेना)
(२) राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेमध्ये एक प्रभागाची रचना करण्याचा निर्णय स्वागतार्ह असून त्यामुळे आर्थिक गरीब असणाऱ्या उमेदवारांना आपल्या प्रभागांमध्ये चांगल्या प्रकारची निवडणूक लढविता येईल . खऱ्या अर्थाने चांगलं काम करणारा प्रतिनिधी निवडून देण्याचा नागरिकांना पर्याय निर्माण होईल म्हणून एक सदस्य प्रभाग भागाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हडपसर विधानसभा मतदार संघाच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करीत आहोत.
– संतोष खरात (अध्यक्ष ,आरपीआय हडपसर विधानसभा)
(३) मागील सन २०१७ च्या चार सदस्यीय प्रभागामध्ये भाजपाला भरभरून यश मिळाले म्हणून यावेळी आघाडी सरकारने एकसदस्यीय प्रभाग केला. गेली 5 वर्षे भाजपाने विकासकामे खूप केली आहेत . मेट्रो असेल, भामा आसखेड प्रकल्पाचे पाणी आणणे असेन, 24 बाय 7 पाण्याच्या टाक्यांचे काम पूर्णत्वास असेल. कोरोनाच्या काळात फक्त भाजप नागरिकांच्यात होता हे वेगळे सांगायचे गरज नाही. त्यामुळे प्रभाग कितीचा पण असो हडपसर मतदारसंघात सर्वाधिक नगरसेवक व महापालिकेत सत्ता ही भाजपची असणार याची खात्री आहे.
– संदिप दळवी, (अध्यक्ष – भाजपा हडपसर विधानसभा मतदार संघ)
(४) राज्य निवडणूक आयोगाने एक सदस्य प्रभाग पद्धतीने प्रभाग रचनेचे आदेश दिले असले तरी राज्य शासनाचे अंतिम आदेश अजुन यायचे आहे. कॉंग्रेस कार्यकर्ते एकसदस्य अथवा द्विसदस्य प्रभागासाठी असो, पूर्णपणे तयार आहेत. मागील काही वर्षात तसेच कोरोना काळात कॉंग्रेसच्या माध्यमातून प्रचंड समाजसेवी उपक्रम राबवले आहेत त्यामुळे हडपसर मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाबाबत आश्वासक वातावरण आहे. त्यामुळे कितीचाही प्रभाग असो, पक्षादेश येईल त्यापद्धतीने निवडणूकिला यशस्वीपणे सामोरे जाऊ.
– प्रा. शोएब शफी इनामदार (अध्यक्ष, हडपसर विधानसभा कॉंग्रेस कमिटी)
(५) निवडणूक आयोगाने कामाच्या पध्दतीत दिरंगाई होवू नये. यासाठी हा निर्णय जाहीर केला आहे.मात्र राज्य सरकार येत्या काही दिवसात द्विसदस्यीय प्रभाग पध्दतीचा निर्णय जाहीर करेल असा विश्वास आहे. एक किंवा दोनचा प्रभाग झाला तरी हडपसर विधानसभा मतदार सं़घांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आधिक निवडणुन येतील.यापूर्वी आधिक नगरसेवक निवडणून आले आहेत.पूर्व भागामुळे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता नक्कीच येईल. हडपसर विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो.येथील नगरसेवक पदाधिकारी यांचा जनतेशी असलेला दाडंगा संपर्क याचा फायदा होईल.
– डॉ. शंतनु जगदाळे( अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा मतदार संघ)
(६) आम्ही एक सदस्य प्रभाग रचनेचे पक्षाच्या माध्यमातून नक्कीच स्वागत करतो. यामुळे सर्व सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळेल. तसा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचा फायदाच होईल . आमचे सन २००७ मध्ये ८ नगरसेवक होते व १२ उमेदवारांनी दुस-या क्रमांकाची मते घेतली होती. तेच २०१२ मध्ये २९ नगरसेवक होते व १८ ठिकाणी आम्ही दुस-या क्रमांकाची मते घेतली आहे. व २०१७ मध्ये २ नगरसेवक जरी असलो तरी २३ ठिकाणी आम्ही दुसर्या क्रमांक मते घेतली होती आणि आता एक सदस्य प्रभाग रचना राहिली तर नक्कीच पुण्याचा महापौर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठरवेल.
– साईनाथ बाबर (गटनेते – मनसे ,नगरसेवक पुणे मनपा)