पुणे – मोटारीतून जाताना वडापाव खाण्याची तलफ एका महिलेला चांगलीच महागात पडली आहे. पर्समध्ये असलेले सोन्याचे दागिने आणि रोकड मोटारीत ठेउन वडापाव आणण्यासाठी गेल्यानंतर चोरट्यांनी महिलेची पर्स चोरून नेली.
ही घटना २४ ऑगस्टला संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास सहकारनगरमधील अहिल्यादेवी चौकात घडली. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने सहकानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फिर्यादी महिला सहकानगरमध्ये राहायला आहेत. दोन दिवसांपुर्वी त्या मोटारीतून घराकडे चालल्या होत्या. त्यावेळी धनकवडीतील अमृततुल्य दुकानासमोर महिला वडापाव घेण्यासाठी थांबल्या होत्या. मोटारीतील डाव्या सीटवर त्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली पर्स ठेवली होती.
महिला वडापाव घेण्यासाठी उतरली असता, चोरट्यांनी त्यांच्या पर्सवर डल्ला मारून दागिन्यांसह रोकड चोरून नेली. वडापाव घेउन आल्यानंतर महिलेला मोटारीत पर्स दिसली नाही. त्यामुळे त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे तपास करीत आहेत.