ग्रामस्थांचा मनोज जरांगे यांना पाठिंबा
कोंढवा खुर्द – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना कोंढवा खुर्द येथील ग्रामस्थांनी जाहीर पाठिंबा दिला. येथील छत्रपती शिवरायांच्या मंदिरात महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन ग्रामस्थांनी भैरवनाथ मंदिरापासून नरवीर तानाजी मालुसरे चौकापर्यंत व तेथून परत भैरवनाथ मंदिर असा लॉंग मार्च काढला. सरकारने वेळीच आरक्षण दिले नाही तर, तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे समाजबांधवांनी यावेळी सांगितले.
“मनोज जरांगे पाटील यांना उत्तम आरोग्य मिळो’
कोंढवा बु. – मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. त्यांना उत्तम आरोग्य मिळावे, यासाठी कोंढवा बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने ग्रामदैवत काळभैरवनाथांची पूजा, प्रार्थना करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत सोमजी चौक येथे साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. यावेळी मराठा समाज आरक्षण समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.
लोकप्रतिनिधींना आजपासून प्रवेशबंदी
सिंहगडरस्ता – मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी नांदेड गावातील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी सरदार पिलाजीराव जाधवराव चौकामध्ये चौकसभेचे आयोजन केले होते. यावेळी नांदेड गावामध्ये लोकप्रतिनिधींना प्रवेशबंदी करण्याचा ठराव ग्रामस्थांनी बोलून दाखवला. आरक्षणामुळे मराठा समाज शिक्षण, नोकरी यामध्ये संधी उपलब्ध होतील. “आधी आरक्षण मग इलेक्शन’ अशी भूमिका काही ग्रामस्थांनी मांडली. जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सर्वजण एकत्र येण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
बहुजन समाजाचा मराठा आरक्षणास पाठिंबा
वारजे – मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास आणि मराठा आरक्षणास पाठिंबा देण्यासाठी कर्वेनगर, रामनगर, वारजे माळवाडी, शिवणे भागांतील बहुजन समाज एकवटला आहे. या पार्श्वभूमीवर वारजेतील स्व. रमेश वांजळे हायवे चौक उड्डाणपुलाखाली शांततेत आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, प्रदी धुमाळ, भारतभूषण बराटे, पैगंबर शेख, नीलेश वांजळे, प्रकाश साळवे, गौरव दांगट, साई जोशी आदींनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन दीपक बलाढे, नीलेश आगळे, चंद्रकांत कांबळे, आश्विन ढगे, रियाज शेख, अरविंद शिंदे, दत्ता चव्हाण, रवि तांबारे, गुणवंत घोडके, किशोर म्हस्के यांनी केले. आभार अरविंद शिंदे यांनी मानले.
एकदिवसीय लाक्षणिक उपोषण
धानोरी – सकल मराठा समाजाच्या वतीने विठ्ठल मंदिरासमोर लहान मुले-मुली, वयोवृद्ध नागरिक, सर्वपक्षीय नेतेमंडळी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणात सहभागी झाले. यावेळी विदर्भातील कुणबी समाजाच्या वतीने दिलीप डाळीमकर, लिंगायत समाजाच्या वतीने गुरुनाथ बिराजदार, वंचित बहुजन आघाडी तसेच भीम लहुजी महासंग्राम सामाजिक विकास संघटना, भीमाशंकर आदिवासी मित्रमंडळ धानोरीच्या वतीने या उपोषणास पाठिंबा देण्यात आला. गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत मशाल मिरवणूक काढण्यात आली.