लखनौ – उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात कंटेनरची झाडाला धडक बसून चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बांगरमऊ-लखनऊ रस्त्यावर गुरूवारी सकाळी झाला आहे. हसमुद्दीन (वय 40, रा. भागपुर, बुलंदशहर) असे अपघातात मृत्यू पावलेल्या चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मुस्तफाबाद येथे कंटेनर झाडावर जाऊन आदळला. अपघातात चालक स्टेअरिंगमध्ये अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक लोकांच्या मदतीने चालकाला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पोलीसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.