जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे आंदोलन : पंचायत समितीसमोर दिल्या घोषणा
राजगुरूनगर- जिल्हा परिषद राज्य कर्मचारी संघटनेने पुकारण्यात आलेल्या एक दिवसीय संपात खेड पंचायत समितीच्या विविध संघटनाच्या कर्मचारी वर्गाने संपात सहभागी होऊन राजगुरूनगर येथे कार्यालयासमोर एकत्र जमुन घोषणा दिल्या. एक दिवसीय संपामुळे तालुक्यातील प्राथमिक शाळा बंद राहिल्या तर पंचायत समितीतील सर्व विभागातील लिपिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्याने सर्व विभागाचे कामकाज ठप्प होते.
एकदिसीय संप करण्यात येऊन सरकारने मागण्याबाबत सकारात्मक भूमिका न घेतल्यास बुधवार (दि. 11) पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे यांच्याकडे संघटनेच्या पदाधिकारी यांनी देऊन काम बंद आंदोलन केले.राज्यातील ग्रामसेवकांनी 9 ऑगस्टपासून असहकार पुकाराला, तर 22 ऑगस्टपासून संघटनेने बेमुदत आंदोलन सुरु केल्याने ग्रामपंचायत स्तरावर कामे ठप्प झाली असून संगणक ऑपरेटर संपावर असल्याने शासकीय कामकाजासाठी लागणारे विविध दाखले मिळत नसल्यामुळे जनतेची कामे रखडली आहेत. याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे प्रशासकीय स्तरावरील दाखले मिळत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांची चागंलीच धावपळ उडत असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खेड पंचायतीसमोर एक दिवसीय संपाचे नेतृत्व रमेश इष्टे, चंद्रीका तळपे, रमेश भोगावडे, अजय मुद्रांकित, शिक्षक संघटनेचे शांताराम नेहरे, राजेश कांबळे, धर्मराज पवळे, रमेश आंबेकर, प्रताप शिंदे, गणेश बाबंळे, गणेश रोकडे, मायादेवी भागंरे आदिसह शिक्षक, शिक्षिका आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- या आहेत मागण्या..
जुनी पेन्शन योजना लागु करावी
वेतनत्रुटी दूर कराव्या
खासगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करुन कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे
केंद्राप्रमाणे महिलांना प्रस्रूती बालसंगोपन रजा सवलती लागु करणे
केंद्राप्रमाणे भत्ते मिळावे
अनुकंपा भरती तात्काळ विनाअट करावी
अर्जित रजा साठवण्याची कमाल मर्यादा काढावी
शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये
आरोग्य व शिक्षण यांचेवर जीडीपीच्या 6 टक्के खर्च करुन आरोग्य सेवेचे खासगीकरण बंद करावे
तास निश्चित होईपर्यंत बायोमेट्रीक प्रणाली लागु करु नये