नगर (प्रतिनिधी) – अपार्टमेंटमधील दुचाकी चोरी करताना स्थानिकांनी दोघांना पकडले. त्यातील एक जण पळून गेला तर दुसर्याला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सोमवारी (दि. 1) पहाटे सव्वाच्या सुमारास सावेडी उपनगरातील जुने लेबर कोर्टजवळील अक्षय अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली.
तेजस भिवसेन ठाणगे (रा. सावेडी गाव) असे पकडलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. त्याचा साथीदार अक्षय शिंदे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. सावेडी गाव) हा पळून गेला आहे. मल्हार दत्तात्रय देशपांडे (वय ५२ रा. अक्षय अपार्टमेंट, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय अपार्टमेंटमधील धनंजय गाडेकर व त्यांचा भाऊ आकाश गाडेकर सोमवारी पहाटे सव्वा वाजता बाहेरून घरी आले असता त्यांना अपार्टमेंटमध्ये दोघे जण देशपांडे यांच्या दुचाकीचे हॅण्डलचे लॉक तोडत असताना मिळून आले.
तसेच त्या दोघांनी इतर दुचाकीतून पेट्रोल चोरले व तोडफोड करून नुकसानही केले असल्याचे समोर आले आहे. त्या दोघांना पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना अक्षय शिंदे पळून गेला तर ठाणगे याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.