इंदूर – पेट्रोल आणि डिझेलच्या भरमसाठ दरांमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. अशात इंधन दरवाढीच्या भडक्यामुळे बसणाऱ्या चटक्याचा दाह कमी करण्यासाठी मध्यप्रदेशचे ऊर्जा मंत्री प्रद्युम्नसिंह तोमर यांनी उतारा सांगितला आहे. त्यांनी सायकल चालवण्याचा पर्याय सुचवला आहे.
भाजप नेते असणाऱ्या तोमर यांना पत्रकारांनी वाढत्या इंधन दरांविषयी प्रश्न विचारला. त्यावर मंत्री महोदयांनी अजब उत्तर दिले. आपण कधी सायकलवरून भाजी मंडईत जातो का? सायकलिंग शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त ठेवते.
तसेच, प्रदुषणापासूनही मुक्ती मिळते. आपल्यासाठी पेट्रोल-डिझेल महत्वाचे की देशाची आरोग्य सेवा? पेट्रोल-डिझेलवरील करांच्या रूपातून मिळणारे उत्पन्न कुठल्या नेत्याच्या घरात जाते का? त्या उत्पन्नाचा वापर उपचार, शिक्षण आणि अन्नधान्यांची गरज असणाऱ्या गरीब जनतेसाठी केला जातो, असे तोमर म्हणाले.
मागील तीस दिवसांच्या माझ्या कार्यक्रमांचा तपशील असणारी डायरी पहा. त्यातून मी कारने किती प्रवास केला, किती सायकल चालवली किंवा किती चाललो याची माहिती मिळेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.