नवी दिल्ली – देशभरातील नागरिकांचा इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे कल काहीसा वाढला आहे. मात्र ओला स्कूटर आणि ओकिनावा स्कूटरला लागलेल्या आगीच्या घटनांमुळे इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. या घटनांटी गांभीर्याने दखल घेत केंद्र सरकारने ‘डीआरडीओ’ला या घटनांची चौकशी करण्यास सांगितले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने एका अधिसूचनेत म्हटले की, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) सेंटर फॉर फायर एक्सप्लोझिव्ह अँड एन्व्हायर्नमेंट सेफ्टी (CFEES) युनिटला पुण्यातील ओला स्कूटर आणि वेल्लोरमधील ओकिनावा स्कूटरला आग लागण्याच्या घटनेच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने CFEES ला घटनेचे कारण तसेच अशा घटना रोखण्यासाठी अधिक चांगल्या उपाययोजना सुचवण्यास सांगण्यात आलं आहे.
तत्पूर्वी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव, गिरीधर अरमानी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “सरकारने ओला इलेक्ट्रिक स्कूटरला लागलेल्या आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील स्वतंत्र तज्ज्ञ या घटनेची चौकशी करून त्यांचा अहवाल मंत्रालयाला सादर करतील.
महाराष्ट्रातील पुणे शहरातील धानोरी परिसरात शनिवारी ओला स्कूटरला अचानक आग लागल्याची घटना समोर आली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हापासून इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षेबाबत लोकांमध्ये संशय निर्माण होत आहे.