लंडन : सुमारे 50 कोटी रुपयांच्या सोन्याच्या टॉयलेटची चोरी केलेल्या एका टोळीला जेरबंद करण्यास लंडन पोलिसांना यश आले आहे. 2019 मध्ये हे टॉयलेट चोरीला गेले होते, त्याचा तपास करण्यात आणि चोरांना पकडण्यात पोलिसांना तब्बल चार वर्षाचा कालावधी लागला.
ब्रिटनचे माजी पंतप्रधान विस्टन चर्चिल यांचा ज्या राजवाड्यात जन्म झाला होता, त्या ब्लेनहेम पॅलेस मध्ये हे सोन्याचे टॉयलेट उभारण्यात आले होते. 2019 मध्ये त्याची चोरी झाली होती. आत्तापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना अटक केले आहे, पण आत्तापर्यंत कोणावरही आरोपपत्र दाखल करण्यात आले नव्हते, पण गेल्या आठवड्यात पोलिसांनी या सात पैकी चार जणांवर आरोपपत्र दाखल केले असून गुन्हेगारी स्वरूपाचा कट करून चोरी करणे असा आरोप ठेवण्यात आला आहे.
अर्थात या चोरी प्रकरणी जरी सर्व चोरांना अटक करण्यात आले असली तरी मुद्देमाल ताब्यात घेण्यात मात्र पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. पोलिसांनी व्यक्त केलेल्या शंकेप्रमाणे चोरांनी चोरी केल्यानंतर या टॉयलेटची विल्हेवाट लावली असावी त्यामुळे हा मुद्देमाल मूळ स्वरूपात परत येण्याची शक्यता खूपच कमी आहे.