कराड – राज्यात करोनामुळे 15 फेब्रुवारीपर्यंत परीक्षा ऑनलाइन घेतल्या जाणार आहेत. राज्यातील करोनाचा आढावा आणि कुलगुरूंशी चर्चा करून 15 फेब्रुवारीनंतर पुढील परीक्षा ऑफलाइन घेण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. राज्यातील महाविद्यालये उद्या, दि. 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. करोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले.
कराडच्या शासकीय अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा आढावा मंत्री उदय सामंत यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. तंत्रशिक्षण विभागाचे पुणे येथील सहसंचालक दत्तात्रय जाधव, प्राचार्य डॉ. अशोक पिसे, अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल देशपांडे, विभागप्रमुख डॉ. अनिल आचार्य, डॉ. सुनील पाटील, डॉ. प्रसाद जोशी व प्राचार्य उपस्थित होते. ना. सामंत म्हणाले, शासकीय महाविद्यालयांमध्ये स्वच्छता ठेवण्याचे काम वर्ग 4 चे कर्मचारी करतात.
करारावर नियुक्त करण्यात आलेल्या वर्ग 4 कर्मचारी व सफाई कामगारांना किमान वेतन देण्याचा प्रस्ताव आठ दिवसांत सादर करावा. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील मुलींसाठी वसतिगृह बांधण्यात येणार आहे. महाविद्यालयाला “रुसा’मधून भरीव मदत केली जाईल.
प्राध्यापकांच्या रिक्त पदांबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला शासनाने कळवले आहे. करोनामुळे बंद असलेली राज्यातील महाविद्यालये मंगळवार, दि. 1 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. स्थानिक पातळीवरील करोना संसर्गाची स्थिती पाहून महाविद्यालये सुरू करावीत. विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी शिबिरे घ्यावीत. याबाबतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. खासगी महाविद्यालयांनी लसीकरण मोहीम राबवून विद्यार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण करून घेण्याचीही सक्ती करण्यात आली आहे.