पिंपरी – बहीण – भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. या पवित्र धाग्याचे नाते जपत मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई देवस्थानच्या वतीने श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांना दरवर्षी राखी पाठवण्याची परंपरा या ही वर्षी संस्थांनी कायम ठेवली. गेल्या अनेक वर्षांपासुन श्री संत मुक्ताई देवस्थानतर्फे तीनही संत भावंडांना नारळीपौर्णिमा, रक्षाबंधननिमित्त राखी अर्पण करण्यात येते.
श्री मुक्ताई देवस्थानच्या वतीने विश्वस्त संदीप रविंद्र पाटील व अंकीता पाटील यांनी गुरूवारी (दि.11) सकाळी पहाटे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांवर अभिषेक केला. त्यानंतर माऊलींच्या संजीवन समाधीवर राखी अर्पण केली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने बहिण मुक्ताबाईला साडी चोळी भेट म्हणून मिळाली. यावेळी विशाल महाराज खोले, दीपक महाराज, सागर महाराज, गणेश महाराज व आदी वारकरी उपस्थित होते.
श्री क्षेत्र आळंदीत सकाळपासूनच राखीपौर्णिमेची धुम पहायला मिळाली. माऊली मंदिर परिसर व गावात ठिकठिकाणी राख्यांचे स्टॉल लागले होते. राखी खरेदीसाठी महिलांनी या स्टॉलवर मोठी गर्दी केल्याचे चित्र होते. याशिवाय माऊलींच्या दर्शनासाठीदेखील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तर पीएमपी बसलादेखील प्रवाशांची गर्दी पहायला मिळाली.