जम्मू: अमरनाथ यात्रा बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या संमतीने काढल्या जाणाऱ्या अमरनाथ मंदिराच्या प्रथम पूजा यात्रेला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न एका आयएएस अधिकाऱ्याने केला असून त्याच्या विरोधात कारवाई करण्याची शिफारस जम्मू काश्मीरच्या प्रशासनाने कार्मिक विभागाकडे केली आहे.
आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या विरोधात जम्मू काश्मीरच्या प्रशासनाने कार्मिक विभागाकडे कारवाईची शिफारस करण्याचा अलिकडच्या काळातील हा पहिलाच प्रसंग आहे.
प्रथेनुसार अमरनाथच्या प्रथम पूजेसाठी जी यात्रा काढली जाते त्याला या अधिकाऱ्याने प्रतिबंध केल्याची तक्रार अमरनाथ श्राईन बोर्डाने केली आहे. त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. नायब राज्यपालांकडेही तक्रार करण्यात आली असून नायब राज्यपालांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे.
या यात्रेनंतरच अमरनाथ यात्रा दरवर्षी सुरू होत असते. यंदाची अमरनाथ यात्रा 21 जुलैपासून सुरू होणार असून करोनामुळे ती यंदा 15 दिवसांचीच असणार आहे.