पणजी – गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर गोत्यात आले आहेत. त्यांच्या मोबाइलवरून एका व्हॉटसअप ग्रृपवर अश्लील मेसेज टाकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणात खुद्द कवळेकर यांनीच पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. आपला मोबाइल हॅक झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
त्याचबरोबर जेव्हा मोबाइलवरून मेसेज पाठवण्यात आला तेव्हा आपण झोपलो होतो. मोबाइल हॅक झाला होता, त्यामुळे आपल्याला याची काहीच कल्पना नसल्याचे त्यांनी गुन्हे शाखेत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
तसेच आपल्या मोबाइलमध्ये अनेक व्हॉटस अप ग्रुप आहेत. त्यातील एकाच ग्रुपवर हा मेसेज पाठवण्यात आला. आपल्याला बदनाम करण्याचा हा एक कट असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, या ग्रुपवर अनेक महिला अधिकारी आणि कार्यकर्त्या आहेत. त्यामुळे हा लैंगिक शोषणाचा प्रकार मानला जात असून त्यावरून मंत्र्यांविरूध्दच गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी एका पक्षाच्या महिला शाखेने केली आहे.