ग्राबुन्डेन (स्विडन) – आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल अथवा इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्या कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. कोणी फ्री टॉक टाईमचे आमिष दाखवतात तर कोणी अनलिमिटेड इंटरनेट सेवा देण्याचे आश्वासन देतात. मात्र स्विडनमधील एका मोबाईल कंपनीने या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एक नामी शक्कल लढवली आहे. सदर कंपनीने दिलेल्या एका ताज्या जाहिरातीनुसार, जर कोणा पालकांनी त्यांच्या नवजात अर्भकाचे नाव त्या विशिष्ट मोबाईल कंपनीच्या नावावरुन ठेवले, तर अशा कुटुंबातील सर्व सदस्यांना 18 वर्षे मोफत इंटरनेट सेवा दिली जाणार आहे.
विशेष म्हणजे ग्राबुन्डेन या शहरातील एका दाम्पत्याने या जाहिरातीला त्वरीत प्रतिसाद देत आपल्या नवजात मुलाच्या नावात सदर इंटरनेट सेवा पुरवठादार कंपनीचे नाव गुंफले असून, या कुटुंबाला 18 वर्षे मोफत इंटरनेट सेवा देण्याचे कंपनीने कबूलही केले आहे.
सदर इंटरनेट सेवा पुरवठादार कंपनीचे नाव ट्वीफी असे असून कंपनीने म्हटले आहे की, मुलांसाठी “ट्वीफियस’ अथवा मुलींसाठी “ट्वीफिया’ असे नाव ठेवल्यास ही कंपनी आपला शब्द पाळेल, आणि त्या कुटुंबातील सर्व सदस्यांना ते बाळ 18 वर्षांचे अर्थात कायदेशीर सज्ञान होईपर्यंत, मोफत इंटरनेट सेवेचा लाभ घेता येईल.
यासंदर्भात, आपले नाव गोपनीय राखण्याच्या अटींवर “ट्वीफियस’च्या पालकांनी सांगितले की, खरे म्हणजे आपल्या नवजात आर्भकाच्या नावाचे हे व्यापारीकरण म्हणता येऊ शकेल. मात्र, आमच्या मुलाच्या अशा नामकरणारे वाचणारे आमच्या कुटुंबाचे सर्व पैसे आम्ही स्वतंत्ररित्या ठेव म्हणून ठेवणार असून, या रकमेचा उपयोग, आमच्या मुलाच्या भविष्यासाठीच केला जाईल. स्विडनमध्ये मुळातच इंटरनेट महाग असून आमच्या घरातील पाच सदस्यांसाठी दरमहा इंटरनेटवर खूपच खर्च होत असतो. त्यामुळे या 18 वर्षांत आमची चांगलीच बचत होणार असून, अशा योजनेला प्रतिसाद देण्यात आम्हाला तरी काही गैर वाटत नाही.