नेपियर – येथील मॅक्लीन पार्क मैदानावर झालेल्या तिसऱ्या व अखेरच्या एकदिवसीय सामन्यात पाहूण्या बांगलादेश संघाने यजमान न्यूझीलंडचा ९ गडी राखून पराभव केला. विशेष म्हणजे हा पराक्रम त्यांनी अवघ्या १५ षटकांत करताना न्यूझीलंडची घरच्या मैदानावर १७ सामन्यांची विजयी मालिका खंडित केली. असे असले तरी न्यूझीलंडने ३ सामन्यांची वनडे मालिका २-१ ने जिंकली. न्यूझीलंडने पहिला वनडे ४४ धावांनी आणि दुसरा वनडे ७ विकेटने जिंकला होता.
न्यूझीलंडला ३१.४ षटकांत अवघ्या ९८ धावांत गुंडाळल्यानंतर कर्णधार नझमुल हुसेन शांतोने ४२ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या आणि अनामूल हकने ३३ चेंडूत ३७ धावा केल्या. बांगलादेशने शनिवारी न्यूझीलंडला दोन संघांमधील वनडेतील सर्वात कमी धावसंख्येवर बादही केले.
तनझिम हसन साकिब व शरीफुल इस्लाम यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. अशा प्रकारे दोघांनीही आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. यासह सौम्या सरकारनेही तीन किवी फलंदाज बाद केले. सर्वसाधारणपणे फलंदाजीसाठी सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या मॅक्लीन पार्कवर बांगलादेशचा कर्णधार शांतोने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Bangladesh Tour of New Zealand
Bangladesh 🆚New Zealand | 3rd ODIBangladesh won by 9 wickets 👏 🇧🇩#BCB | #Cricket | #NZvBAN pic.twitter.com/u9WuSm16AS
— Bangladesh Cricket (@BCBtigers) December 23, 2023
खेळपट्टीवर भरपूर गवत होते, ज्याचा शोरीफुल आणि साकिबने पुरेपूर फायदा घेतला. न्यूझीलंडची आघाडीची फळी कोलमडली आणि त्यांनी ७० धावांत ६ विकेट गमावल्या. न्यूझीलंडसाठी डावातील सर्वात मोठी भागीदारी विल यंग (२६ धावा) आणि टॉम लॅथम (२१ धावा) यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ३६ धावांची झाली. या दोघांशिवाय इतर दोनच फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला.