BAN vs NZ Sylhet Test : विश्वचषक 2023 स्पर्धेतील फ्लॉप शोनंतर बरीच टीका झालेल्या बांगलादेश संघाने आता क्रिकेट जगतात जबरदस्त पुनरागमन केले आहे. बांगलादेश संघाने न्यूझीलंडसारख्या बड्या संघाचा कसोटी क्रिकेटमध्ये पराभव करून गेल्या महिन्यात झालेल्या विश्वचषकातील जखमा भरून काढल्या आहेत. सिलहट येथे खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात बांगलादेशने न्यूझीलंडचा 150 धावांनी पराभव केला. बांगलादेशने कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करण्याची 23 महिन्यांतील ही दुसरी वेळ आहे.
बांगलादेशने यापूर्वी जानेवारी 2022 मध्ये माउंट मोंगानुई कसोटीत न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीवर पराभूत केले होते. बांगलादेशने किवी संघाला कसोटी सामन्यात पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ होती. या ऐतिहासिक विजयानंतर बांगलादेशने सिलहट येथील कसोटीमध्ये देखील विजयाची संस्मरणीय कहाणी लिहिली. या कसोटीच्या पाचही दिवस बांगलादेशने दमदार खेळ दाखवत न्यूझीलंडला पूर्णपणे बॅकफूटवर ठेवले. सामन्याच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी आणखी 219 धावा करायच्या होत्या, तर बांगलादेशला फक्त 3 विकेट्स हव्या होत्या. येथे पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच बांगलादेशच्या गोलंदाजांनी न्यूझीलंड संघाच्या 3 फलंदाजांना गुंडाळत विजय संपादित केला.
Dutch-Bangla Bank Test Series 2023
Bangladesh 🆚 New Zealand 🏏 | 1st TestBangladesh won by 150 runs 🫶
Full Match Details: https://t.co/T3QHK95rOi
Watch the Match Live on Gazi TV, T-Sports & Rabbithole
#BCB | #Cricket | #BANvNZ pic.twitter.com/SiPqNClQkd
— Bangladesh Cricket (@BCBtigers) December 2, 2023
सिलहटमध्ये अशी लिहिली गेली विजयाची कहाणी…
पहिला दिवस: सिलहट कसोटीत न्यूझीलंडचा कर्णधार नझमुल हुसैन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महमुदुल हसन जॉयची 86 धावांची खेळी आणि उर्वरित फलंदाजांच्या छोट्या खेळीमुळे बांगलादेशने पहिल्या दिवशी 9 गडी गमावून 310 धावा केल्या.
दुसरा दिवस : बांगलादेशने दिवसाच्या सुरुवातीलाच 10वी विकेट गमावली. बांगलादेशचा पहिला डाव केवळ 310 धावांवर संपला. यानंतर न्यूझीलंडची सुरुवातही विशेष झाली नाही. संघाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. केन विल्यमसनने शतक झळकावताना एक टोक सांभाळले पण त्याला दुसऱ्या टोकाकडून फारशी साथ मिळाली नाही. विल्यमसनही शतक झळकावून लगेच पॅव्हेलियनमध्ये परतला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंड संघाने 8 विकेट गमावून 266 धावा केल्या होत्या.
तिसरा दिवस : तिसऱ्या दिवशी टीम सौदी (35) ने किवी संघाला 300 च्या पुढे नेले. न्यूझीलंडने पहिल्या डावात 317 धावा केल्या आणि बांगलादेशवर 7 धावांची आघाडी घेतली. यानंतर किवी गोलंदाजांनी धुमाकूळ घातला आणि बांगलादेशच्या दोन्ही सलामीवीरांना झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर न्यूझीलंडची खेळावरील पकड मजबूत होत होती, असं वाटत असतानाचा बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने संयमी खेळ करत शतक झळकावले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशचा संघ 3 गडी गमावून 212 धावा करून सुस्थितीत होता.
चौथा दिवस : बांग्ला फलंदाजांनी हळूहळू डाव पुढे नेत 338 धावा केल्या. अशाप्रकारे न्यूझीलंडला आता विजयासाठी 332 धावांचे लक्ष्य मिळाले होते. या मोठ्या आव्हानापुढे न्यूझीलंड संघानं सपशेल शरणागती पत्कारली. पहिल्या षटकापासूनच विकेट पडण्याचा सिलसिला सुरू झाला आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने 7 गडी गमावून केवळ 113 धावा केल्या होत्या.
पाचवा दिवस : डॅरिल मिशेलने 58 धावा करत काही काळ संघर्ष केला. त्याला टीम साऊदीने 34 धावा काढत साथ दिली मात्र ती अपुरी ठरली. बांगलादेशी गोलंदाजांनी पहिल्या सत्रातच न्यूझीलंडच्या शेवटच्या तीन विकेट घेतल्या. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 181 धावा केल्या. अशाप्रकारे बांगलादेशी संघाने सिलहट येथील कसोटीत 150 धावांनी विजय मिळवला.
तैजुल इस्लामने पटकावल्या 10 विकेट…
बांगलादेशचा डावखुरा फिरकीपटू तैजुल इस्लामला या सामन्यासाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवडण्यात आले. त्याने सामन्याच्या पहिल्या डावात चार तर दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेतल्या. तैजुलशिवाय मोमिनुल हक आणि नईम हसन यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. शरीफुल इस्लाम आणि मेहदी हसन मिराज यांनाही प्रत्येकी 2 बळी मिळाले.