नवी दिली – रशियाची एसयू-३४ बनावटीची ३ लढाऊ विमाने पाडल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्सकी यांनी केला आहे. रशियाच्या दक्षिणेकडील आघाडीवर शुक्रवारी ही विमाने पाडण्यात आली आणि युक्रेनसाठी हे मोठे यश असल्याचे झेलेन्सकी यांनी म्हटले आहे. मात्र रशियाच्या सैन्याने अद्याप या घटनेला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मात्र रशियाच्या युद्धविषयक ब्लॉग लेखकांनी ही विमाने पाडली गेल्याचे मान्य केले आहे. ही विमाने अमेरिकेने पुरवलेल्या पॅट्रिएट क्षेपणास्त्रांच्या माऱ्याने पाडण्यात आली असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. युक्रेनचे हवाई दलाचे कमांडर मायकोला ओलाशेचक यांनी टेलिग्राम ॲपवरच्या पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. ओडेसा प्रांतातील विमानविरोधी विभागाने खेरसोन प्रांतात ही विमाने पाडली. त्याबद्दल त्यांनी या विभागाचे कौतुक देखील केले आहे. खेरसोन हा प्रांत गेल्या वर्षी रशियाने आपल्या मुख्य भूमीला जोडून घेतला होता. हा भाग पुन्हा परत मिळवण्यासाठी युक्रेनचे सैन्य प्रयत्नशील आहे. नोव्हेंबर महिन्यात या प्रांतातील निप्रो नदीच्या तीरावरील काही महत्वाच्या ठिकाणांवर युक्रेनच्या सैन्याने पुन्हा ताबा मिळवला आहे. त्यामुळे खेरसोन प्रांतात युक्रेनचे प्राबल्य वाढले आहे. या ठिकाणांवर मारा करण्यासाठीच रशियाकडून ही लढाऊ विमाने पाठवली गेली होती.