देशभरात एनआरसीची अंमलबजावणी हवी

भाजप नेते मुकुल रॉय आणि स्वपन दासगुप्ता यांची भूमिका

नवी दिल्ली : राष्ट्रीय नागरीक नोंदणी अर्थात “एनआरसी’ची अंमलबजावणी देशभरात केली जाईल, असे पश्‍चिम बंगालमधील भाजपचे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांनी म्हटले आहे. “एनआरसी’ची अंमलबजावणी देशपातळीवर केली जावी, ही भाजपची भूमिका आहे. त्यानुसार देशपातळीवर ही अंमलबजावणी केली जाईल. मात्र “एनआरसी’च्या अंमलबजावणीमुळे भारतातील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण होता कामा नये. ज्यांची नावे “एनआरसी’मधून वगळण्यात आली आहेत, ते कोर्टात आणि लवादापुढे अपील करू शकतात, असे रॉय म्हणाले. बांगलादेशातून आलेल्या हिंदू निर्वासितांना भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठीचे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत पुन्हा एकदा मांडण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपचे राज्यसभेतील सदस्य स्वपन दासगुप्ता यांनीही देशभरात “एनआरसी’ची अंमलबजावणी करण्याच्या मागणीला समर्थन दिले होते. सध्याच्या कायद्यामध्ये खूप त्रुटी असल्याने नवीन नागरिकत्व कायदा अस्तित्वात येईपर्यंत “एनआरसी’ची देशपातळीवरील अंमलबजावणी होऊ नये, असेही ते म्हणाले.

गृहमंत्री अमित शहा यांनीही बुधवारी देशभर “एनआरसी’ची अंमलबजावणी करण्याच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले होते. “कोणत्याही कागदपत्रांशिवाय, प्रक्रियेशिवाय एखाद्या देशात जाऊन स्थायिक होता येईल, असा जगात कोणताही देश नसेल. राष्ट्रीय नागरिक नोंदणी असणे ही काळाची गरज आहे. केवळ आसाममध्येच नव्हे तर संपूर्ण देशभरात “एनआरसी’च्या अंमलबजावणीची गरज असल्याचे शहा म्हणाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.