अहमदाबाद – आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात सलग पाच षटकार फटकावताना वादळी फलंदाजी करताना जी बॅट कोलकाता नाईट रायडर्सच्या रिंकू सिंगने वापरली होती त्याबाबत एन खास बातमी समोर आली आहे. खरेतर ही बॅट नितिश राणाची होती व रिंकूने ती खेळण्यासाठी मागितल्यावर पहिल्यांदा राणा नाही म्हणाला होता. मात्र, नंतर त्याने ही बॅट रिंकूला दिली व त्याने या बॅटने इतिहास घडवला. आता ती बॅट रिंकूचीच आहे, असे नितिश राणा याने मिश्किलपणे सांगितले व रिंकूच्या खेळीचे तोंडभरून कौतुक केले.
या सामन्यात गुजरात टायटन्सने विजयासाठी ठेवलेल्या 205 धावांचा पाठलाग करताना कोलकाताच्या रिंकूने अखेरच्या षटकात यश दयाळच्या गोलंदाजीवर सलग पाच षटकारांची आतषबाजी करत एक स्वप्नवत विजय मिळवून दिला होता. अखेरच्या षटकांत कोलकाताला 29 धावांची गरज होती.
त्यावेळी उमेश यादवने पहिल्या चेंडूवर एक धाव घेत रिंकूला स्ट्राईक दिली व रिंकूने हा कारनामा केला. रिंकूने मला जेव्हा ही बॅट मागितली तेव्हा मी नकारच दिला होता मात्र, नंतर कोणीतरी त्याला ही बॅट दिल्यावर मी काहीही बोललो नाही. पण आता ती बॅट त्याचीच आहे, असे राणा म्हणाला.
उमेशने दिलेला सल्ला यशस्वी ठरला
रिंकूच्या या खेळीमागे उमेश यावने दिलेला सल्लाही महत्वाचा ठरल्याचे रिंकूने सांगितले आहे. उमेशने एक धाव घेतली व मला पाच चेंडू खेळायला दिले. यावेळी त्याने मला सांगितले निकराचे प्रयत्न कर, कोणताही विचार करु नको केवळ प्रत्येक चेंडू फटकावणे हा एकच उद्देश ठेव. असे उमेशने सांगितले व मी तसेच केले व मला यश लाभले आणि संघाचा ऐतिहासक विजय साकार झाला, असे रिंकूने सांगितले.