अहमदाबाद – कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज रिंकू सिंगने एकाच षटकात सलग पाच षटकार फटकावल्यामुळे गुजरात टायटन्सचा गोलंदाज यश दयाळ प्रचंड निराश झाला होता. त्याला आपले अश्रु रोखणे कठीण बनले होते. मात्र, त्याच्या वडिलांनी त्याची समजूत घातली व भारताच्या युवराज सिंगने 2007 सालच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉंडच्या एकाच शटकात सलग सहा षटकार फटकावल्याचे उदाहरण दिले व ब्रॉंडने जशी खंबीर मानसिकता राखली व
नंतर यशस्वी कारकीर्दही घडवली त्याप्रमाणे तू देखील खंबिर बन. श्रीलंकेचा लसित मलिंगा व स्टुअर्ट ब्रॉडसारखे नामवंत गोलंदाजही याच परिस्थितीतून गेले होते परंतु ते निराश झाले नाहीत. त्यांनी अपयशावर मात करत यश खेचून आणले व कारकीर्दही यशस्वी घडवली. त्यांच्याकडून हे शिक, असा सल्ला दिला व यश सावरला.
दयाळने त्या सामन्यात डावातील अखेरचे षटक टाकले व रिंकूने त्याच्या गोलंदजीवर हल्ला चढवला. यामुळे त्याच्या गुजरात संघाला पराभवाचाही सामना करावा लागला. सामना संपल्यावर तो प्रचंड निराश होता. ड्रेसिंगरुममध्ये कर्णधार हार्दिक पंड्या व बदली कर्णधार रशीद खानसह सर्व सहकारी खेळाडूंनीही त्याची समजूत काढत त्याला पाठिंबा दिला होता. मात्र, तरीही तो निराशच होता. अखेर वडिलांनी सांगितलेल्या उदाहरणानंतर तो सावरला.
रिंकू व यश हे दोघेही उत्तरप्रदेशचेच रहिवासी आहेत. रिंकू अलिगढचा तर यश प्रयागराजचा आहे. यशला निराशाजनक मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी तसेच त्याच्याशी संवाद साधण्यासाठी त्याचे वडील चंद्रकांत यांच्यासह त्याची आई, काका व अन्य काही नातेवाइक येत्या 13 तारखेला मोहालीत होत असलेला आयपीएलमधील गुजरातचा पुढील सामना पाहण्यासाठी व यशला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानावर उपस्थित राहणार आहेत.