चंदीगढ – पंजाबमधील सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावी या वर्गांसाठी पंजाबी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. या शाळांमध्ये पंजाबी भाषा एक विषय म्हणून शिकवण्यात येईल. ज्या शाळा या आदेशाचे पालन करणार नाहीत, त्या शाळांना दोन लाख रूपये दंड ठोठावला जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्न यांनीच ही माहिती दिली आहे.
त्याचप्रमाणे चन्न यांनी राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांना देखील तंबी दिली आहे. पंजाबी भाषा आता राज्यातील सरकारी कार्यालयांमध्ये सक्तीची करण्यात आली आहे. त्याशिवाय, पंजाबी भाषा राज्यातल्या सर्व दुकाने, तसेच आस्थापनांच्या बोर्डवर सर्वात वर लिहिली जाईल, असे देखील निर्देश मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी दिले आहेत.
दरम्यान, पंजाबच्या राज्य विधिमंडळात नुकतीच पंजाबी भाषेसंदर्भात दोन महत्त्वाची विधेयके पारीत करण्यात आली आहेत. यामध्ये पंजाबी आणि इतर भाषा शिक्षण सुधारणा विधेयक आणि पंजाब राज्य भाषा सुधारणा विधेयक या विधेयकांचा समावेश आहे.
यानुसार, शाळांमध्ये पंजाबी भाषा सक्तीची करणे आणि सर्व कार्यालयीन कामकाज पंजाबी भाषेतच करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कार्यालयांमध्ये या नियमाचं उल्लंघन झाल्यास सर्वात आधी पाचशे , नंतर दोन हजार आणि तिसऱ्या उलंघनाच्या वेळी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल.