विम्बल्डन – ग्रासकोर्टवर श्रेष्ठ कोण याचे उत्तर आज येथे होणाऱ्या विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत मिळणार आहे. ग्रॅंड स्लॅम स्पर्धावर हुकुमत गाजविणाऱ्या रॉजर फेडरर व नोवाक जोकोविच यांच्यात यासाठी महामुकाबला होणार आहे. या दोन्ही खेळाडूंनी उपांत्य फेरीत अव्वन दर्जाच्या खेळाडूंवर शानदार विजय मिळविला आहे.
फेडररने उपांत्य लढतीत राफेल नदाल याचा 7-6 (7-3), 1-6, 6-3, 6-4 असा पराभव केला. यंदा फ्रेंच स्पर्धेत नदालने त्याला सरळ तीन सेट्समध्ये पराभूत केले होते. या पराभवाची परतफेड करताना फेडररने अतिशय चतुरस्त्र खेळ केला होता. जोकोविचला स्पेनच्या रॉबर्ट बॅटिस्टा ऍग्यूटवर 6-2, 4-6, 6-3, 6-2 असा विजय मिळविताना थोडासा संघर्ष करावा लागला होता. फेडररने आतापर्यंत 20 वेळा ग्रॅंड स्लॅम स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळविले आहे तर जोकोविचने 15 ग्रॅंड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. मात्र या दोघांमध्ये आजपर्यंत झालेल्या 47 लढतींपैकी 25 लढती जोकोविचने जिंकल्या आहेत तर 22 वेळा फेडरर विजयी झाला आहे. ग्रॅंड स्लॅम स्पर्धांमध्ये त्यांच्यात 15 वेळा गाठ पडली आहे. त्यापैकी 9 वेळा जोकोविच विजयी झाला आहे तर 6 वेळा फेडररने बाजी मारली आहे.
फेडररने अंतिम लढतीबाबत सांगितले, या सामन्याचीच मी प्रतीक्षा करीत होतो. नदाल याला पराभूत करण्याचा मला आत्मविश्वास होता. जरी त्याने मला फ्रेंच स्पर्धेत हरविले होते तरीही ग्रासकोर्टवर त्याच्यापेक्षा माझा खेळ चांगला होतो. जोकोविचने गतवर्षी येथे विजेतेपद मिळविले असल्यामुळेच त्याच्यावर विजय मिळविण्यासाठी मला सर्वोच्च कौशल्य दाखवावे लागणार आहे.
जोकोविचने सांगितले की, या स्पर्धेत आतापर्यंत माझा खेळ मनासारखा झाला आहे. आजही तेच सातत्य दाखविण्याचा मी प्रयत्न करीन. फेडरर याला येथे हरविणे हे खडतर आव्हानच असते.
दृष्टीक्षेपात कामगिरी
फेडरर
ऑस्ट्रेलियन 2004, 2006, 2007, 2010, 2017, 2018
फ्रेंच 2009
विम्बल्डन 2003 ते 2007, 2009, 2012, 2017
अमेरिकन 2004 ते 2008
जोकोविच
ऑस्ट्रेलियन 2008, 2011 ते 2013,2015, 2018, 2019
फ्रेंच 2016
विम्बल्डन 2011, 2014, 2015, 2018
अमेरिकन 2011, 2015, 2018