चिदंबरम यांच्या अर्जावरून ‘ईडी’ला नोटीस

नवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम यांनी आयएनएक्‍स मीडिया मनी लॉण्डरिंग प्रकरणातील कागदपत्रे उपलब्ध व्हावीत यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावरून विशेष न्यायालयाने शनिवारी सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) नोटीस बजावून उत्तर मागवले.

संबंधित प्रकरणी ईडीने याआधीच आरोपपत्र दाखल केले आहे. त्या आरोपपत्राची प्रत आणि इतर कागदपत्रे ईडीकडून मिळवण्यासाठी चिदंबरम प्रयत्नशील आहेत. आयएनएक्‍स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने 21 ऑगस्ट 2019 या दिवशी चिदंबरम यांना अटक केली.

त्यानंतर दोन महिन्यांनी त्या प्रकरणाशी संबंधित मनी लॉण्डरिंगच्या आरोपावरून ईडीने चिदंबरम यांचा ताबा मिळवला. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यावरून सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना ऑक्‍टोबर 2019 मध्ये जामीन मंजूर केला.

त्याचवर्षी डिसेंबरमध्ये ईडी चौकशी करत असलेल्या प्रकरणी चिदंबरम यांना जामीन मिळाला. त्याआधी सीबीआयने मे 2017 मध्ये संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आयएनएक्‍स मीडिया समुहाला 305 कोटी रूपयांचा परकी निधी मिळवण्यासाठी 2007 मध्ये फॉरीन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाने मंजुरी दिली. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री असताना ती प्रक्रिया झाली. त्यामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप आहे. सीबीआयनंतर ईडीने त्या प्रकरणाची चौकशी सुरू केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.