पुढचा काळ अधिक आव्हानात्मक; आपल्याला प्राधान्यक्रम ठरवावा लागेल : डॉ. मनमोहन सिंग

नवी दिल्ली – देशाने 1991 मध्ये ज्या आर्थिक संकटाचा सामना केला त्या तुलनेन आपला आगामी काळ अधिक आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सन्मानाने जगता यावे यासाठी आपल्याला प्राधान्यक्रम ठरवावा लागणार असल्याचा सूचनावजा सल्ला माजी पतंप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी आज दिला.

आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्विकारण्याला 30 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मनमोहन सिंग यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, कोविड 19 या जागतिक महामारीच्या ज्या झळा पोहोचल्या आहेत त्यामुळे आपण खूप दु:खी झालो आहोत. लाखो भारतीयांच्या उपजिविकेचे त्यामुळे नुकसान झाले आहे.

1991 मध्ये अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडताना केलेल्या भाषणात त्यांनी त्यावेळी व्हिक्‍टर ह्युगो यांच्या एका वचनाचा दाखला दिला होता. ज्या विचाराची आता वेळ आली आहे, त्या विचाराला पृथ्वीवरची कोणतीही शक्ती रोखू शकत नाही असे ते म्हणाले होते.

आज तीस वर्षांनंतर आपल्याला पुन्हा एक देश म्हणून रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या कवितेचे स्मरण करावे लागेल. आपण दिलेले शब्द आपल्याला पूर्ण करावे लागणार आहेत आणि विश्रांती घेण्यापूर्वी अनेक मैलांचे अंतर पूर्ण करावे लागणार आहे.

आर्थिक उदारीकरणा स्विकारल्यानंतर आता त्याचा पुढचा मार्ग अधिक आव्हानात्मक आहे. आता आनंद साजरा करण्याची किंवा विश्रांतीची वेळ नसून आत्म अवलोकन करण्याची आणि विचार करण्याची गरज आहे. एक देश म्हणून आपल्याला आपल्या प्राधान्यक्रमांची पुन्हा तपासणी करावी लागणार असून प्रत्येक भारतीयाला चांगले आरोग्य आणि सन्मानजनक जीवन जगता येण्याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

ते म्हणाले की आजच्याच दिवशी 30 वर्षांपूर्वी कॉंग्रेस पक्षाने भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्वाच्या सुधारणांचा मार्ग पत्करला होता. त्यातूनच देशाच्या आर्थिक धोरणाला नवा मार्ग मिळाला. गेल्या तीन दशकांत देशातील वेगवेगळ्या सरकारांनी याच मार्गावरून चालताना देशाच्या 3 अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहिले.

त्यामुळेच आपला देश जगातल्या प्रमुख अर्थशक्तींमध्ये समाविष्ट होउ शकला आहे. त्यातला महत्वाचा भाग 30 कोटी भारतीयांना गरीबीतून बाहेर काढता आले आहे. हजारो- लाखो नव्या नौकऱ्या निर्माण करता आल्या आहेत. सुधारणांच्या या प्रक्रियेत भूमिका बजावण्याची संधी कॉंग्रेस पक्षाला मिळाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.