इम्रान खान पाकिस्तानच्या भूमिकेपासून विचलित; शाहबाझ शरीफ यांची टीका

इस्लामाबाद  – काश्‍मीरच्या नागरिकांना पाकिस्तानमध्ये सामील होण्याबद्दल विचारणार असल्याच्या इम्रान खान यांच्या प्रतिपादनावर पाकिस्तानचे विरोधी नेते शाहबाझ शरीफ यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

पाकिस्तानच्या ऐतिहासिक आणि घटनात्मक भूमिकेपासून इम्रान खान विचलित झाले आहेत. संयुक्त राष्ट्राने मान्य केलेल्या पाकिस्तानच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका इम्रान खान मांडत आहेत, अशी टीका शाहबाझ शरीफ यांनी केली आहे.

“काश्‍मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात सामील व्हायचे आहे का स्वतंत्र देशात रहायचे आहे याबद्दल त्यांचे मत जाणून घेणार आहे.’ असे प्रतिपादन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कालच व्यक्त केले होते. पाकिस्तान व्यप्त काश्‍मीरमधील तरार खाल आणि कोतली या भागातील निवडणूकीच्या प्रचार सभांमध्ये बोलत असताना त्यांनी हे मत व्यक्त केले होते.

पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरमध्ये उद्या प्रांतीय विधीमंडळाच्या निवडणूका होणार आहेत.
पाक व्याप्त काश्‍मीरला पाकिस्तानचा नवीन प्रांत बनवला जात असल्याचा विरोधकांचा दावा इम्रान खान यांनी फेटाळून लावला होता. ही कल्पना कधी आणि कशी पसरवली गेली, हेच आपल्याला समजत नाही, असे ते म्हणाले होते.

इम्रान खान यांच्यापूर्वी मरियम नवाझ यांनीही पाक व्याप्त काश्‍मीरमध्ये प्रचार केला होता. पाकव्याप्त काश्‍मीरला प्रांत बनवून या भागाची रचना बदलण्याचे इम्रान खान यांनी ठरवले असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

पाकिस्तानमध्ये सामील व्हायचे की भारतामध्ये सामील व्हायचे याबाबत काश्‍मीरमधील सार्वमताच्या आधारे पाकिस्तानने संसदेमध्ये मंजूर केलेल्या धोरणानुसार काश्‍मीरचा प्रश्‍न संयुक्तराष्ट्रातील ठरावानुसार सोडवण्यात यावा, असे धोरण मंजूर करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.