नवी दिल्ली: केरळमध्ये गर्भवती हत्तीणीची हत्या होण्याच्या घटनेची दखल राष्ट्रीय हरित लवादानेही घेतली आहे. या शिकारीची चौकशी करण्यासाठी हरित लवादाने एका समितीची स्थापना केली असून या प्रकरणाचा कृती अहवालही मागितला आहे.
फटाक्यांनी भरलेले अननस या हत्तीणीला खायला घातले गेले होते. हत्तीणीने हे अननस खाल्यानंतर त्या फटाक्यांचा स्फोट झाला होता. त्यात त्या हत्तीणीचा मृत्यू झाला होता. ही घटना वेल्ल्यार नदीकिनारी 27 मे रोजी घडली होती. शवविच्छेदन केल्यानंतर ही हत्तीण गर्भवती होती, असे निष्पन्न झाले होते.
फटाक्यांच्या स्फोटामुळे या हत्तीणीचा जबडा तुटला होता. ती फटाक्यांनी भरलेले अननस चावू शकली नव्हती. या अननसांचा तिच्या तोंडातच स्फोट झाला होता. ही हत्या अत्यंत क्रौर्याची होती, असे हरित लवादाने म्हटले आहे. या घटनेनंतर देशभरातील वन्यपशू प्रेमींमध्ये संतापाची लाट उमटली होती. सोशल मीडियावर या घटनेबाबतचे वृत्त पसरल्यामुळे याबद्दल तीव्र भावना व्यक्त व्हायला लागल्या होत्या.
वन्य पशूंबाबत जे निकष ठरवून दिले गेले आहेत, त्याचे उघड उल्लंघन या घटनेमध्ये झाले आहे. वनक्षेत्रातील पशूंबाबत असे वर्तन केले जात असल्यामुळेच हे पशू रहिवासी क्षेत्रात मानवाला त्रास देत असतात. असे सांगून न्या. के. रामकृष्णन आणि न्या. साइबल दासगुप्ता यांच्या पिठाने केरळच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाला नोटीस बजावली आणि 10 जुलैपर्यंत कृती अहवाल मागवला आहे.