लक्षवेधी : जगाची अशी स्थिती का झाली?

– उदय देवळाणकर

मानवानेही आजवर अनेक संकटांना तोंड दिले; पण जी समज पशु-पक्ष्यांना असते किंवा अनेक पशू-पक्ष्यांना जशी आगामी संकटाची चाहूल लागते, तशी मानवाला या संकटाची चाहूल लागली नाही. असे का झाले? आज जगाची जी अवस्था होऊन बसली आहे त्याचं मूळ कशात आहे? मानवी समाजाने शांतपणाने आजही आपल्या धोरणांचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.

करोना महामारीमुळे आज सर्व यंत्रणा, आरोग्यव्यवस्था, बाजारपेठ, मूल्यप्रणाली, शिक्षण, व्यवस्थापन, कायदा सुव्यवस्था आणि एकूणच सृष्टीवर अधिराज्य गाजवण्याचं आपलं मोठेपण धोक्‍यात आलं आहे. आजवर मानवाला या सर्वांवर नियंत्रण मिळवल्याचा अभिमान होता; पण करोनानं या समजाला छेद दिला आहे. मानवाने आजवर अनेक संकटांना तोंड दिलं; पण अनेक पशू-पक्ष्यांना जशी आगामी संकटाची चाहूल लागते तशी मानवाला या संकटाची, त्याच्या भयावहतेची चाहूल लागली नाही. असे का झाले?

जगाच्या सुरुवातीला म्हणजे मानवी संस्कृतीचा विकास सुरू झाल्यानंतर विचारांनी आणि संस्कृतींनी जन्म घेतला. एक होती उत्पादकांची संस्कृती. सामाजिक कौशल्य, सामाजिक सद्‌भावना, सामाजिक कामांचं वाटप, त्यातून आयुष्याची प्रत किंवा गुणवत्ता वाढवतील अशा पदार्थांचं उत्पादन यातून भारतीय संस्कृतीचा विकास होत गेला. युरोपिय देशांमध्ये शेतीचा हंगाम पाच-सहा महिन्यांचा असतो. विषुववृत्तीय वातावरणात रेनफॉरेस्ट आहेत आणि तिथे दररोज पाऊस पडतो, त्यामुळे तेथे नियंत्रणातील शेती करणे शक्‍य होत नाही. अन्य ठिकाणी वाळवंटीय प्रदेशात पर्जन्यमान अत्यंत कमी असल्याने सलग शेती करणे शक्‍य नव्हते, त्यामुळे तेथे मानवी संस्कृतीचा विकास करणे शक्‍य नव्हते.

युरोपातही सहा महिने बर्फ पडलेला असल्याने तिथे अन्न प्रिझर्व्ह करून टिकवलेले असायचे; पण त्याला एक प्रकारचा वास यायचा. त्यामध्ये “व्हॅल्यू ऍडिशन’ करण्याचे काम भारतीय मसाल्यांनी केले. भारतातून जो व्यापार सुरू झाला त्यातून लवंग, दालचिनी, तमालपत्र, लसूण, कांदा, आले हे भारतीय पदार्थ तेथे जाऊ लागले. यामुळे तेथील नागरिकांच्या आयुष्यालाही एक रुची आली. कापडाचा शोधही भारताने लावला.

वास्तविक या व्यापारामध्ये संपूर्ण भारतीय समाज आणि गावखेड्यांमधील लोक सामावलेले होते; पण इंग्रजांनी आपल्या वांशिक, धार्मिक, भौगोलिक अस्मिता, वर्णवर्चस्व, जातीय तेढ, धार्मिक तेढ आदींना पद्धतशीरपणे खतपाणी घातले. आपल्या मूल्यव्यवस्थेवर घाला घालण्यासाठी शिक्षणपद्धती आणली. त्याचबरोबर यामागे त्यांचा डाव होता की, या बाजारपेठांमध्ये भारतीय उत्पादकांकडून अत्यंत स्वस्त दरात शेतमाल किंवा अन्य उत्पादने विकत घ्यायची आणि हा कच्चा माल विदेशात पाठवून तेथे त्यांच्या भांडवलातून तयार झालेला पक्‍का माल भारतीयांवर लादायचा. या नीतीतून मोठ्या शहरांची निर्मिती झाली. महात्मा गांधींनी म्हणूनच विदेशी वस्तूंचा बहिष्कार करण्याचे धोरण अवलंबले होते. आपल्या कष्टातून उत्पादित झालेले सामान आपण वापरायचे असा गांधीजींचा आग्रह होता.

इंग्रजांची करपद्धती नाकारणे आणि भारतीय उत्पादन प्रक्रियेवर त्यांनी केलेले आक्रमण झुगारणे अशा दोन मार्गांनी आपण ब्रिटिशांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिशांनी 126-27 देशांवर राज्य केले. पण जगभरात राजवटी करताना शोषणावर आधारित व्यवस्था निर्माण केली गेली. त्यातून मोठ्या शहरांची निर्मिती झाली. अनैसर्गिक पद्धतीने माल, पैसा, पदार्थ यांचे केंद्रीकरण सुरू झाले. संचय केलेल्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी त्यांना क्षमता वाढवावी लागली. यातून मेकॅनिकल इंजिनिअरींगचे युग आले, तसे कामगारांची चणचण भासू लागली.

ती दूर करण्यासाठी शेतीवर दबाव आणण्यात आला. गावागावांतील उद्योग बुडवून त्यांना शहरांकडे पलायन करण्यास भाग पाडले. यातून ब्रिटिशांना स्वस्तात कामगार मिळू लागले.
आज मुंबई, बॅंकॉक, न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस, सॅनफ्रासिस्को, जास्त घनतेच्या झगमगीत महानगरांमध्ये काय दिसते? जुगाराचे अड्डे, प्रचंड प्रमाणात येणारा काळा पैसा यांची सद्दी दिसते. ज्याला आपण असांस्कृतिक गोष्टी म्हणतो त्यांना इकॉनॉमीच्या खाली इथे संरक्षण दिलेले दिसते. इथे उधळण्यात येणारा प्रचंड प्रमाणातील पैसा हा पृथ्वीचे दोहन करून, कष्टकऱ्यांचे शोषण करूनच आलेला असतो. या भांडवलाची हाव प्रचंड असल्याने आपण एका दलदलीत फसत चाललो आहोत. करोना महामारीनंतर हे उजागर झाले आहे.

आधुनिक जीवनशैलीला पोसण्यासाठी उभारलेले बंदिस्त मॉल, विमानतळे आदी ठिकाणचे डक्‍ट एसी आज आपले शत्रू झाले आहेत. इथल्या एस्केलेटर्सवर हात ठेवण्याची हिंमत होत नाही. याचाच अर्थ आपण यश म्हणून जे उभे केले तेच आज आपला पराभव करण्यासाठी उभे ठाकले आहे. एका विषाणूच्या भीतीने आज विमानतळावर जाण्यास लोक घाबरत आहेत.

सद्यःस्थितीत मानवी समाजाने शांतपणाने आपल्या धोरणांचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. गाव-खेड्यांमध्ये कृषी उत्पादनावर तिथेच प्रक्रिया करण्यास प्राधान्य द्यायला हवे. भांडवलाचा हव्यास कमी करायला हवा. तसे झाले तर आपल्या मातीमध्ये, माणसामध्ये आणि शेतीमध्ये इतकी क्षमता आहे की अशा समस्यांना निश्‍चित उत्तर मिळू शकेल. छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास आजन्म प्रेरणादायी आहे. त्यांनी, संभाजीराजांनी इंग्रजांना निक्षून सांगितले की, तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना लुटायचे नाही.

औरंगजेबालाही सांगितले, फिरंगे व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत असल्याने त्यांना तुम्ही संरक्षण देऊ नका. पुरू राजाने अलेक्‍झांडरला सांगितले होते, तुझी फौज चालत जाण्याने आमच्या शेतीचे नुकसान होते. बाजीराव पेशव्यांचा फौजा आपल्या ज्वारीच्या शेतातून गेल्यावर मल्हारराव होळकरांनी त्यांना ढेकूळ फेकून मारले होते. मल्हारराव असो किंवा पुरू राजा यांच्यातील वृत्ती सर्वांमध्ये असायला हवी. शेतीवर पडणारे छोटेसे पाऊल किंवा अतिक्रमण विघातक ठरू शकेल, हे लक्षात घ्यायला हवे. निदान आता या गोष्टींकडे गांभीर्याने पाहता आले पाहिजे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.