टोकियो – नॉर्वेच्या कार्सटन वारहोमने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावतानाच नव्या विश्वविक्रमाची नोंद केली. त्याने अवघ्या एका सेकंदाच्या फरकाने विश्वविक्रम मोडला.
या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या अमेरिकेच्या राइ बेंजामिन यानेही विक्रम साकार केला. दोन वेळा जागतिक विजेता असलेल्या कार्सटनने 45.95 सेकंदांत शर्यत पूर्ण केली. या शर्यतीत सहभागी झालेल्या सातपैकी सहा खेळाडूंनी आपले राष्ट्रीय विक्रम मागे टाकले व नवी वेळ दिली.
कार्सटनने गेल्या महिन्यात ओस्लोमध्ये 46.70 सेकंदांचा विक्रम प्रस्थापित केला होता. त्याने हाच विक्रम मोडला. या शर्यतीत रजत पदक जिंकणाऱ्या बेंजामिनने 46.17 सेकंदांचा वेळ घेत आपल्या स्वत:च्याच कामगिरीला मागे टाकले. इतकेच नव्हे तर ब्राझीलच्या एलिसन डोस सांतोस याने या शर्यतीत ब्रॉंझपदक प्राप्त करताना 46.72 सेकंदांमध्ये शर्यत पूर्ण करत आपलाच नवा विक्रम साकार केला.
त्याने केवळ 0.02 सेकंद आधी ही शर्यत पूर्ण केली असती तर एकाच शर्यतीत एकाच वेळी सुवर्ण, रौप्य आणि ब्रॉंझपदक जिंकणाऱ्या तिन्ही खेळाडूंनी विश्वविक्रम करण्याची अनोखी कामगिरी घडली असती.