पिंपरी, (प्रतिनिधी) – आरटीई अंतर्गत प्रवेशाला असणारी अडथळ्यांची शर्यत संपता संपेना झाली आहे. शासनाच्या जाचक अटींमुळे अनेक विद्यार्थी या मधून प्रवेश घेण्यापासून वंचित राहणार आहेत. आता एखाद्या खासगी शाळेच्या एक किलोमीटर परिसरात शासकीय अथवा अनुदानित शाळा असल्यास त्या खासगी शाळेला आरटीईचा २५ टक्के आरक्षणाचा नियम लागू नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी खासगी शाळेमध्ये शिक्षण घेऊ शकणार नसल्याने पालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये ‘आरटीई’च्या माध्यमातून २५ टक्के जागेवर मोफत प्रवेश दिला जातो. घरापासून साधारणपणे तीन किलोमीटरच्या आत असलेल्या शाळांमध्ये मुलांच्या शिक्षणाची सोय होत असे; मात्र या शैक्षणिक वर्षापासून या प्रक्रियेत्त बदल करण्यात आले आहेत.
खासगी विनाअनुदानित शाळेच्या एक किमी परिसरात सरकारी वा अनुदानित शाळा असल्यास खासगी इंग्रजी शाळेत आता प्रवेश घेता येणार नाही. पिंपरी चिंचवड शहारातील अनेक खासगी नामांकित शाळांच्या एक किलोमीटरच्या आतच महापालिका शाळा आहेत. त्यामुळे अशा भागातील पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश खासगी नामांकित इंग्रजी शाळेत घेता येणार नाही. त्यांना सरकारी शाळेतच प्रवेश घ्यावा लागणार आहे.
या पूर्वी शासनाने एक नियम घालून दिला होता. त्यामध्ये घरापासून एक किलोमीटर लांब असलेल्या शाळेमध्येच आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्याची मुभा दिली होती. या निर्णयावर पालकांनी नाराजी व्यक्त केली होती. पाल्याला घराच्या जवळ असलेली शाळा असल्यास सोयीची होत असल्याचे पालकांचे म्हणणे होते. एक किमीटर लांब असल्यास नोकरदार पालक पाल्यांना सोडायला कसे जातील, अशा तक्रारी पालक मांडत होते. त्यामध्ये आता नवीन नियमांची भर पडल्याने विद्यार्थी मोफत इंग्रजी शिक्षण घेऊ शकणार नसल्याचे चित्र आहे.