North-East Express Accident : बिहारमधील बक्सर येथे नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचा अपघात झाला आहे. डाउन लाइनवरून जाणारी ही गाडी रुळावरून घसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात रेल्वेच्या अनेक बोगी रुळावरून घसरून पडल्या. बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला.
VIDEO | Locals gather for rescue works at the accident site where 12506 North East Express derailed earlier today. pic.twitter.com/bK8WJ96TRU
— Press Trust of India (@PTI_News) October 11, 2023
ही ट्रेन बक्सरहून रघुनाथपूरला पोहोचताच ट्रेनच्या अनेक बोगी रुळावरून घसरल्या. या प्रकरणाला पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. बक्सरचे एसपी म्हणाले की, ट्रेन क्रमांक 2506 नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस रुळावरून घसरली आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
ही ट्रेन दिल्लीतील आनंद विहार स्थानकावरून कामाख्याच्या दिशेने जात होती. ही गाडी बक्सर जंक्शनहून अराहला निघाली असताना हा अपघात झाला. त्यानंतर ही ट्रेन रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरली, त्यानंतर इतर गाड्या थांबवण्यात आल्या.
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, रात्री 12 वाजेपर्यंत या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघातात मोठ्या प्रमाणात प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूर्व मध्य रेल्वे विभागाच्या वतीने अपघात निवारण वाहन वैद्यकीय पथक आणि अधिकाऱ्यांसह अपघातस्थळी रवाना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.