कृषी विधेयकांवर मतदानच घेतले नाही

राज्यसभेच्या उपाध्यक्षांविरोधात अविश्‍वास ठराव

नवी दिल्ली – राज्यसभेमध्ये मतदान न घेताच ज्या पद्धतीने कृषीविषयक दोन महत्वाची विधेयके केवळ घाईगडबडीत आवाजी मतदानाने मंजूर केली गेली, ते पाहता राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव मांडण्यासाठी अब्बल 12 विरोधी पक्षांनी आज नोटीस दिली.

 राज्यसभेचे सदस्य कामकाज तहकूब करण्याची मागणी करत असतानाही कामकाजाचा कालावधी उपाध्यक्षांनी वाढवला. विरोधकांनी केलेला विरोध डावलून कामकाज सुरूच ठेवण्यात आले होते. ही विधेयके आवाजी मतदानाने मंजूर करून घेतली होती. राज्यसभेमध्ये मतदानासाठी ही विधेयके मांडली गेलीच नाहीत. त्यामुळे उपाध्यक्षांच्याविरोधात अविश्‍वास ठरावची नोटीस देण्यात अली आहे. 

कॉंग्रेस, अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस, समाजवादी पार्टी, तेलंगणा राष्ट्र समिती, माकप, सीपीएम, राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय जनता दल, नॅशनल कॉन्फरन्स, द्रमुक आणि आम आदमी पार्टी या पक्षांनी उपाध्यक्षांवरील अविश्‍वास ठरावासाठी नोटीस दिली आहे.

ज्या पद्धतीने विधेयक मंजूर झाले त्यामुळे लोकशाहीची हत्या झाली आहे. त्यामुळे 12 पक्षांनी उपाध्यक्षांविरोधात अविश्वासाची नोटीस दिली आहे, असे कॉंग्रेस नेते अहमद पटेल म्हणाले.

राज्यसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर विरोधी सदस्यांनी राज्यसभेतच ठिय्या दिला होता.
राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी संयुक्‍त जनता दलाचे हरिवंश यांची अधिवेशनच्या पहिल्या दिवशी, 14 सप्टेंबरला फेरनिवड करण्यात अली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.