मुंबई – देशभरातील विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची मुंबईत दोन दिवस बैठक पार पडणार आहे. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार असून आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बैठकीवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज पत्रकारसोबत बोलताना त्यांनी ‘इंडिया आघाडीला हरवणं अशक्य आहे’, असं खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीआधीच खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. “भाजप आमच्या बैठकीला घाबरली आहे. त्यामुळेच महायुतीची बैठक घेत आहेत. भाजप – शिंदे गटाने ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक घेऊ द्या नाही तर चांद्रयान खाली बोलावून त्यात बसून चंद्रावर जात बैठक घेऊ द्या. तरीही काहीही होणार नाही. आता आमच्या आघाडीचा पराभव करणं कोणालाही शक्य नाही, आम्ही एक आहोत आणि एक राहणार असे राऊत म्हणाले. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत.”
पुढे ते म्हणाले की, “राहुल गांधी हे देशातील निर्विवाद नेता आहेत. त्यांचं नेतृत्व आम्हा सर्वांना मान्य आहे. त्यांना देशभरातील लोकांचं समर्थन आहे. त्यामुळे इंडियाला हरवणं आता शक्य नाही. कुणाच्याही बापाला ते जमणार नाही. 2024 च्या निवडणुकीत इंडिया आघाडी जिंकणार आहे. लोकांचं आम्हाला समर्थन आहे. इंडियाला हरवणं मुश्कीलच नाही तर नामुमकीन आहे. येत्या काळात आमचंच सरकार सत्तेत येणार आहे. या बैठकीतून आम्ही देशासमोर मोठा अॅक्शन प्लॅन घेऊन येऊ,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, इंडिया आघाडीची आज 31 ऑगस्ट आणि उद्या 1 सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी महायुतीचीही मुंबईत आज आणि उद्या बैठक आयोजित करण्यात आली आहे. महायुतीची बैठक आज संध्याकाळी 8 वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सर्व प्रमुख नेते आणि मंत्री यांच्यासह भोजन कार्यक्रम व चर्चा असा कार्यक्रम ठरलेला आहे.
महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह आरपीआय (आठवले गट), आरपीआय (जोगेंद्र कवाडे गट), बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, जन सुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर, प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहेत. हे सर्व घटक पक्ष या बैठकांना उपस्थित राहणार आहेत. महायुतीची बैठक वरळीच्या डोम सभागृहात होणार आहे.