मुंबई : ‘शासन कार्यनियमावलीच्या दुसऱ्या अनुसूचित निर्दिष्ट केलेली सर्व प्रकरणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत मुख्यमंत्री महोदयांना सादर करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत’, असा आदेश मुख्य सचिवांनी काढला. यावरून आता काँग्रेसने अजित पवार यांच्यासह शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक ट्वीट करत याविषयी टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये विजय वडेट्टीवार यांनी, “दादांच्या दादागिरीला भाईंचा लगाम. अजित पवार मंत्रिमंडळात येऊन दोन महिनेही झाले नाही, पण त्यांच्या दादागिरीने आता ठाण्याच्या भाईंना मैदानात उतरावे लागले. कोणत्याही फाईली, विशेषत वित्त विभागाने नाकारलेले प्रस्ताव हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.”
“आता मुख्यमंत्र्यांना नक्कीच कळलं असेल एखाद्याला जेवायला आपले ताट द्यावे पण बसायला पाट देऊ नये”, असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी टोला लगावला.
दरम्यान, अजित पवार यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यापासून शिंदे गट तसेच भाजपमध्ये अस्वस्थता होती. त्यातच अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांत बैठका आणि निर्णयांचा धडाका लावताना मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांची नाराजी ओढवून घेतली होती. त्यामुळे पवार यांच्या कारभाराला लगाम लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून यापुढे आपल्याकडे येणाऱ्या सर्व महत्त्वाच्या तसेच प्रसंगी वित्त विभागाने नाकारलेल्या फाईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत आपल्याकडे पाठवाव्यात, असे आदेश शिंदे यांनी प्रशासनास दिले.