पुणे – जगभरामध्ये सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले असून भारतात देखील या जीवघेण्या आजाराने पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात देखील कोरोनाचा संसर्ग झालेले ५२ रुग्ण आढळले असून यामुळं राज्य शासनाने कठोर उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना मुक्त संचार न करण्याचे आवाहन केले असून राज्यातील जीवनावश्यक वस्तू व सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर राज्यातील काही ठिकाणी चिकन विक्रेत्यांनी देखील आपली दुकाने बंद केली होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबोधित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी चिकन विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवारांची ही सूचना कर्जत-जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून शेअर करत राज्यातील चिकनची दुकाने बंद ठेवण्याची गरज नसल्याचं म्हंटलं आहे.
चिकनची दुकाने सुरु ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks दादा यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे चिकनची दुकाने बंद ठेवण्याची गरज नाही. https://t.co/S0r2uTMekv
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 21, 2020