नवी दिल्ली :- बराक ओबामांमुळे सहा मुस्लिमबहुल देशांवर बॉम्बस्फोट झाले. पंतप्रधान मोदी जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर होते, तेव्हाच अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी (बराक ओबामा) भारतीय मुस्लिमांबद्दल वक्तव्य करणे, हे आश्चर्यकारक आहे, असे म्हणत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ओबामा यांना प्रत्युत्तर दिले.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अलीकडेच भारतातील अल्पसंख्यांक मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असताना ओबामा यांनी हे वक्तव्य केले. यावर निर्मला सीतारामन यांनी तिखट प्रतिक्रिया दिली.
निर्मला सीतारामन म्हणाल्या, मी अत्यंत जबाबदारपणे बोलत आहे. आम्हाला अमेरिकेशी चांगले मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे आहेत. पण कदाचित त्यांच्यामुळेच (ओबामा) सहा मुस्लिमबहुल देशांवर बॉम्बस्फोट झाले होते. तरीही ते भारतातील धार्मिक सहिष्णुतेवर टिप्पण्या करत आहेत.
ओबामांच्या कार्यकालात सीरिया ते येमेन आणि सौदी अरेबिया ते इराक अशा देशांवर बॉम्बस्फोट झाले नाहीत का? तेव्हा सात देशांमध्ये युद्धाजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या देशांत शेकडो बॉम्ब टाकले होते. असे नेते (बराक ओबामा) जेव्हा भारताच्या धार्मिक सहिष्णुतेवर भाष्य करतात, तेव्हा त्यांना कोण गांभीर्याने घेणार? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.