नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बॅंकेला हजारो कोटींचा चुना लावून फरार झालेल्या नीरव मोदीच्या भावाविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. इंटरपोलने निहाल मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. तर, नीरव मोदी सध्या ब्रिटनच्या तुरुंगात आहे.
40 वर्षीय बेल्जियम नागरिक असलेल्या निहालविरोधात जागतिक अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास ईडी करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निहाल मोदीचा जन्म बेल्जियमच्या एंटवर्प येथे झाला आणि त्यांला इंग्रजी, गुजराती आणि हिंदी भाषा समजते. पीएनबी घोटाळा प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या आरोप पत्रामध्ये त्याचे नाव आहे. निहाल मोदीवर महत्वाचे पुरावे नष्ट केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी पीएनबी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत.
मागच्या वर्षी हे प्रकरण समोर आले. या दोघांनी पंजाब नॅशनल बॅंकेला तब्बल 14 हजार कोटी रुपयांचा चूना लावला आहे. दरम्यान, पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्यातील सूत्रधार नीरव मोदी याच्या कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.