चिंबळी – निघोजे (ता. खेड) येथे ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने दि. 11 ते 15 जुलैपर्यंत संपूर्ण गाव बंद ठेवण्यात येणार असल्याचे निवेदन महाळुंगे पोलिसांना दिले आहे. अशी माहिती सरपंच रमेश गायकवाड व ग्रामविकास अधिकारी व्ही. एल. गाडीलकर यांनी दिली.
निघोजे गावात पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले असल्याने घरोघरी जाऊन सुरक्षेविषयक आवाहन करण्यात येत आहे. विनामास्क गावात विनाकारण फिरणाऱ्यास पाच हजार रुपये दंड आकारण्यात येऊन कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. बंद कालावधीत दवाखाना, मेडिकल सुरू राहतील.
तसेच किराणा व भाजीपाला दुकाने सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत खुली राहणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी उपसरपंच निलेश पवार, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र आल्हाट, पोलीसपाटील राहुल फडके, तलाठी बी. आर. जाधव तसेच सर्व सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.