निफ्टी नव्या विक्रमी पातळीवर

मुंबई – भारताची स्थूल अर्थव्यवस्था बळकट आहे. करोनावर लस दृष्टिपथात आली आहे. या कारणामुळे भारतीय शेअरबाजारात खरेदी चालूच आहे. त्यातल्या त्यात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बरीच खरेदी करण्यात चालू ठेवल्यामुळे शेअरबाजाराचे निर्देशांक मंगळवारी नव्या विक्रमी पातळीवर गेले. 

राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 1 टक्‍क्‍याने म्हणजे 128 अंकांनी उसळून प्रथमच 13 हजार अंकांच्या पुढे जाऊन 13,055 अंकांवर बंद झाला. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 445 अंकांनी वाढून 44,0523 अंकांवर बंद झाला. बाजारातील सोमवारच्या आकडेवारीनुसार सोमवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी तब्बल 4,738 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. डॉलरच्या तुलनेत रुपया दहा पैशांनी वधारला. यामुळेही गुंतवणूकदारांना खरेदी सुरक्षित वाटत आहे.

आजच्या तेजीचे नेतृत्व बॅंका, वाहन आणि वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांनी केले. या क्षेत्रांचे निर्देशांक 2.37 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. ऍक्‍सिस बॅंक, महिंद्रा, एचडीएफसी बॅंक, आयटीसी, स्टेट बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, मारुती, कोटक बॅंक, सन फार्मा या कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली.
आर्थिक अडचणीत असलेल्या लक्ष्मीविलास बॅंकेचा शेअर गेल्या सात दिवसांत 53 टक्‍क्‍यांनी कोसळला आहे. आज राष्ट्रीय शेअरबाजारावर या बॅंकेचा शेअर नीचांकी पातळीवर गेला.
निफ्टी आठ महिन्यांत 73 टक्‍क्‍यांनी वाढला

मार्च महिन्यामध्ये निर्देशांक कोसळल्यानंतर भारतीय शेअरबाजारांनी दमदार कामगिरी केली आहे. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक आठ महिन्यांत तब्बल 73 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. 24 मार्च रोजी 7511 अंकांवर असलेला निफ्टी आता 13 हजारांच्या पुढे गेला आहे. निफ्टी अंतर्गत बहुतांश क्षेत्राचे आणि कंपन्यांचे शेअर वाढत आहेत. दुसऱ्या तिमाहीत भारतीय कंपन्यांनी चांगली कामगिरी केली असल्यामुळे गुंतवणूकदार खरेदी करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.