गोवाहटी- अटकेत असलेले माहिती अधिकार कार्यकर्ते अखिल गोगोई यांच्या घरावर राष्ट्रीय तपास संस्था अर्थात “एनआयए’ने आज छापा घातला आणि घराची तपासणी केली. गोगोई यांच्या घरातून “एनआयए’ने काही कागदपत्रे आणि लॅपटॉप जप्त केला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अखिल गोगोई हे काही शेतकरी संघटनांना सल्ला देत असत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याखाली आसाममध्ये आंदोलन भडकले असताना गोगोई यांना अटक करण्यात आली होती.
कृषक मुक्ती संग्राम संघटनेचा नेता आसणाऱ्या गोगोई यांच्यावर बेकायदा कारवाया प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
गोवाहटी येथील नाझारापारा भागातील गोगोई यांच्या घराच्या झडतीची ही कारवाई सकाळी 7 वाजता सुरू झाली आणि तब्बल तीन तास घराची कसून तपासणी करण्यात आली. घरातून पॅन कार्ड, एसबीआयचे डेबीट कार्ट, निवडणूक फोटो ओळखपत्र आणि बॅंकेचे पासबुकही जप्त करण्यात आले आहे. याशिवाय उपनिबंधकांनी दिलेले सहकारी संस्थांच्या नोदणीचे प्रमाणपत्र, पुरात्व खात्याचे अधिक्षक मिलन कुमार चौले यांनी दिलेले पत्र, “क्रेडिट डिपॉझिट रेश्यो केएमएसएस फाईल मिसेलिनियस’, जेल 2015, जेल डायरी 2014 आणि “एलएचपीसी’ असे लिहीलेल्या फायलीही जप्त करण्यात आल्या आहेत.
“एनआयए’च्या पथकाने घरातील काही फायली तपासल्या आणि त्यातील काही बरोबर नेल्या. त्या फायलींच्या प्रती मागितल्यावर त्याला अधिकाऱ्यांनी नकार दिला. अखिल गोगोई पूर्वी तुरुंगात असताना त्यांची दहशतवाद्यांची भेट झाली होती का? असेही अधिकाऱ्यांनी विचारल्याचे गोगोई यांच्या पत्नी गीताश्री तामुटी यांनी सांगितले.
अखिल गोगोई यांचे माओवादी कम्युनिस्ट पार्टीशी संबंध असल्याचा आरोप आहे.