नवी दिल्ली : छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यातील दर्भ खोऱ्यात माओवाद्यांच्या हल्ल्यात 26 कॉंग्रेस नेत्यांची हत्या करण्यात आल्याच्या घटनेला सहा वर्ष उलटल्यानंतर त्यातील फरार सुत्रधाराला अटक करण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेला यश आले.
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) प्रवक्यांनी याबाबतचे एक निवेदन प्रसिध्दीस दिले आहे. छत्तीसगढमधील विजापूर जिल्ह्याचा रहिवासी असणारी सुमित्रा उर्फ सुमित्रा पुनेम या फरार माओवाद्याला अटक करण्यात आली. एनआयएने तिची ओळख पटवली असून तीचे खरे नाव पुष्पल असे आहे. ती छत्तिसगढमध्ये उभारण्यात आलेल्या माओवाद्यांच्या दर्भ विभागीय समितीची दल कमांडर आहे. याच गटाने छत्तिसगढमध्ये कॉंग्रेस नेत्यांवर हल्ला घडवून आणला.
छत्तिसगढमध्ये 25 मे 2013 रोजी कॉंग्रेस नेत्यांच्या ताफ्यावर माओवाद्यांनी हल्ला केला होता, त्यात किमान 26 जण मरण पावले होते. छत्तिसगढ कॉंग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार पटेल यांचा मृतांत समावेश होता. माजी केंद्रीय मत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विद्याचरण शुक्ला हे या हल्ल्यात जखमी झाले होते. त्यातच उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
एनआयएने हा तपास हाती घेतला होता. त्यावेळी फरारी आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.