अमृतसर – रोम हून अमृतसरला आलेल्या चार्टर्ड फ्लाईट मधील 173 प्रवासी करोना पॉझिटीव्ह असल्याचे विमानतळावर करण्यात आलेल्या चाचणीतून आढळून आले. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला.
याच विमानतळावर गुरूवारी इटालीतूनच आलेल्या विमानातील 125 प्रवासी करोना पॉझीटीव्ह असल्याचा अहवाल विमानतळावरील तपासणी संस्थेने दिला होता. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावरच गोंधळ घातला. शेवटी एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाने या प्रकरणात हस्तक्षेप करून प्रवाशांची करोना चाचणी घेणाऱ्या संस्थेकडून हे काम काढून घेऊन तेथे स्थानिक संस्थेला हे काम देण्यात आले.
दिल्लीतील संस्थेकडून येथील विमानतळावर करोना चाचणी केली जात होती. त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रवाशांनी जोरदार आक्षेप घेतला. प्रवाशांचे म्हणणे असे होते की आम्ही विमानात बसताना करोनाची चाचणी दिली होती. ती चाचणी निगेटीव्ह आल्यानेच आम्हाला विमान प्रवासाला अनुमती मिळाली.
जेमतेम प्रवासाचा कालावधी उलटल्यावर लगेचच आम्ही पॉझिटीव्ह कसे आलो अशी विचारणा प्रवाशांनी केली. एअरपोर्ट अथॉरिटीने या प्रकाराच्या चौकशीचा आदेश दिला आहे; ज्या संस्थेने येथील प्रवाशांची चाचणी घेतली त्या संस्थेला हे काम गेल्या महिन्याच्या पंधरा तारखेपासून देण्यात आले होते.