नवी दिल्ली – महंमद अझरुद्दीनचा पॅडलस्वीप, महेंद्रसिंग घोनीचा हेलिकॉप्टर शॉट, सचिन तेंडुलकरचा लॉफ्टेड ड्राईव्ह हे फटके जागतिक क्रिकेटमध्ये जेव्हा अवतरले तेव्हा चाहत्यांमध्ये ते प्रचंड लोकप्रिय झाले. आता एका स्थानिक टेनिस बॉलच्या क्रिकेट सामन्यात एका फलंदाजाने नवा शॉट शोधला आहे.
सोशल मीडियावर सध्या या शॉटचा व्हिडिओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्याचे नाव उल्टा-पुल्टा पॅडलशॉट असे केले आहे. आता आगामी काळात जागतिक क्रिकेटमध्ये कोणा फलंदाजाने हा शॉट मारला तर त्याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. हा सामना कुठे खेळला गेला, असा नावीन्यपूर्ण फटका खेळणारा फलंदाज कोण, या सामन्याचा निकाल काय लागला यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नसले तरीही हा व्हीडिओ प्रचंड गाजत आहे.
एका स्थानिक क्रिकेट सामन्यात एका फलंदाजाने हा नवा फटका क्रिकेटला बहाल केला आहे. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील या सामन्यात एका गोलंदाजाने एक चेंडू टाकला, त्यावेळी फलंदाजाने आपल्या पायांच्यामधून यष्टीच्या मागे चेंडू अत्यंत नावीन्यपूर्ण पद्धतीने फटकावून चौकार मिळविला. पायांमधून चेंडू फटकावण्याचे या फलंदाजाचे टायमिंगचेही कौतुक होत आहे.