पंच गोल्ड यांची ऑस्ट्रेलिया संघावर टीका
मेलबर्न – दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू चेंडू कुरतडल्यामुळे शिक्षेला सामोरे गेले होते तसेच काहींवर कारवाई देखील झाली होती. चेंडू कुरतडणे ही तर त्यावेळी ऑस्ट्रेलियाची रणनीतीच होती, अशा शब्दात या मालिकेत पंचगिरी केलेल्या इयान गोल्ड यांनी गौप्यस्फोट केला आहे.
ऑस्ट्रेलियाचा तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानेच एका मुलाखतीत याबाबत कबुली दिली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघावर प्रचंड टीका झाली होती. स्मिथच्या या कृतीमुळे क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाची खूप बदनामी झाली होती. या मालिकेत जेव्हा मी टीव्हीवर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडून चेंडू कुरडतला जातोय हे पाहिले तेव्हा माझाही यावर विश्वासच बसला नाही. पण खरी परिस्थिती लगेचच समोर आली व त्यांनी चेंडू कुरतडण्याचीच रणनिती ठेवल्याचेही स्पष्ट झाले.
खरेतर ही घटना घडण्याच्या आधीपासूनच ऑस्ट्रेलियाचा संघ अनेकदा त्यांच्या वर्तनामुळे सातत्याने टीकेचा धनी बनत होता. त्यांचे मैदानावरील वर्तन, वागण्याबोलण्याची रीत या सगळ्याच गोष्टींत त्याना टीकेचा सामना करावा लागत होता, असे गोल्ड यांनी सांगितले.
माय लाईफ इन क्रिकेट या आत्मचरित्रात गोल्ड यांनी या व अशा अनेक घटनांचा खुलासा केला आहे. अर्थात या प्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कर्णधार स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षाची क्रिकेटबंदी घातली होती, तर कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट याच्यावर 9 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती.