fbpx

कॉंग्रेसच्या ‘बॅनर’वर सुशीलकुमार, प्रणिती शिंदे यांचे फोटो ‘गायब’; प्रचारसभेत कॉंग्रेसचा ‘गोंधळ’

राज्यमंत्री सतेज पाटील यांना करावी लागली मध्यस्थी

सोलापूर – कॉंग्रेसच्या बॅनरवर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांची छायाचित्रे नसल्याने कॉंग्रेसच्या संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ रविवारी सोलापुरातील हेरिटेज लॉन येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा प्रकार घडला. अखेर राज्यमंत्री सतेज पाटील यांनी विनंतीपूर्वक हाथ जोडत सभेच्या ठिकाणाहून निघून जाऊ का असे सांगत मध्यस्थी केल्यानंतर कॉंग्रेसचे कार्यकर्ते शांत झाले.

प्रचार सभेसाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. मात्र स्टेजवरील बॅनरवर शिंदे पितापुत्रीची छायाचित्रे नसल्याने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सभेत गोंधळ घातला आणि निषेधाच्या घोषणा देत नाराजी व्यक्त केली.

मात्र राज्यमंत्री सतेज पाटील यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केल्याने वातावरण शांत झाले. शिंदे साहेबांचा फोटो नजरचुकीने राहिला असून शिंदेसाहेब आमच्या हृदयात आहेत आणि कायम असतील, असे सांगत कार्यकर्त्यांना शांत केले.

सुशीलकुमार आणि आमदार प्रणिती शिंदे मागासवर्गीय असल्याने राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक छायाचित्र टाकणे टाळले असल्याचा आरोप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.