मुंबई – शेअर बाजार निर्देशांकांना नफेखोरीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसापासून शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 51 हजार अंकाच्या खाली बंद झाला.
गेल्या पाच दिवसापासून इतर क्षेत्राचे निर्देशांक कमी होत असताना सरकारी बॅंकांचा निर्देशांक वाढत होता. मात्र आज सरकारी बॅंकांच्या शेअरचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
बाजार बंद होताना सेन्सेक्स 0.85 टक्क्यानी म्हणजे 434 अंकानी कमी होऊन 50,889 अंकांवर बंद झाला. तर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 137 अंकांनी कोसळून 14,981 अंकांवर बंद झाला.
दोन्ही निर्देशांक महत्त्वपूर्ण पातळ्याच्या खाली घसरल्यामुळे ब्रोकसनी चिंता व्यक्त केली. शेअर बाजारातील घडामोडी बाबत बोलताना अँजेल ब्रोकिंगचे विश्लेषक सुमित चव्हाण यांनी सांगितले की निर्देशांकात चार दिवसापासून घट होत असली तरी हे सर्वसाधारण करेक्शन आहे. आगामी काळात निर्देशांकात फार मोठी घट होण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांना वाटत.
मिड कॅप, स्मॉल कॅप आघाडीवर
शेअर बाजारात गेल्या आठवड्यात मुख्य निर्देशांकात बरीच घट झाली असली तरी छोट्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी मात्र गुंतवणूकदारांकडून चालूच आहे. त्यामुळे एकीकडे मुख्य निर्देशांक कमी होत असताना मिड कॅप आणि स्मॉल कॅप मात्र वाढत असल्याचे दिसून येत आहे.