सातारा : शंभूराज-उदयनराजे भेटीमुळे जिल्हा बॅंकेचे राजकारण तापले

गृह राज्यमंत्र्यांशी खलबते झाल्यानंतर खासदारांची शाब्दिक फटकेबाजी

सातारा – शिवजयंतीच्या मुहूर्तावर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची साताऱ्यात त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन कमराबंद खलबते केली. डीसीसी आलीय म्हटल्यावर थोडं फार होणारच. माझं तर आहेच, कोण कशी आखणी करतेय, ते काळ ठरवेल, बघूया, अशा शब्दांत उदयनराजेंनी फटकेबाजी केल्याने जिल्हा बॅंकेचे राजकारण तापायला सुरवात झाली आहे.

बॅंकेच्या निवडणुकीबाबत अद्याप कोणतेही वक्‍तव्य न केलेल्या उदयनराजेंच्या यांनी सूचक इशारा दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे कान टवकारले आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणुकीची रणधुमाळी सर्वपक्षीय ठरावांमुळे रंगात येत आहे.

या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस, शिवसेना व भाजपने केली आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाचे नेते प्रतिक्रिया व्यक्‍त करत आहेत; परंतु याबाबत अजूनपर्यंत मौन बाळगलेल्या उदयनराजेंनी प्रसारमाध्यमांना खाद्य पुरविले आहे.

पोवई नाक्‍यावरील “कोयना दौलत’ या गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी उदयनराजेंनी त्यांची भेट घेतली. उदयनराजे व शंभूराज देसाई यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे; परंतु या भेटीला जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचा संदर्भ असल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्या अर्थाने ही राजकीय भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.

भेटीनंतर काय म्हणाले उदयनराजे?
जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवण्याची तयारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरू केली आहे. यासाठी बैठकांना गेल्या काही दिवसांपासून गती आली आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर सक्रिय झाले असून त्यांनी रचना करायला सुरुवात केली आहे. त्याबाबत विचारले असता, उदयनराजे म्हणाले, मी माझ्यापुरते बोलू शकतो.

फलटणचे राजे असूद्यात, सातारचे आमचे राजे असूद्यात किंवा बाकीचे सगळे राजे, लोकशाहीतील राजे असूद्यात. डीसीसी आलीय म्हटल्यावर थोडंफार होणारच. आमचं तर आहेच. कोणी कितीही, कशीही आखणी केली, तरी काळ ठरवेल, बघूया. जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत उदयनराजेंनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्‍त केल्याने, ही निवडणूक सरळ होणार नसल्याचे दिसत आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात आत्मीयतेने मांडणी होणे आवश्‍यक आहे. राजकारणविरहीत मांडणीसाठी श्वेतपत्रिका प्रकाशित करण्याची मागणी राज्यातील प्रमुख नेत्यांकडे केल्याचे उदयनराजेंनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.