Stock Market | तेजीने सलामी! नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी निर्देशांक ‘वाढले’

मुंबई – नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात बरीच खरेदी केल्यामुळे निर्देशांक एक टक्‍क्‍याने वाढले. देशातील मोठ्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत असूनही गुंतवणूकदारांनी निर्देशांक खालच्या पातळीवर गेल्यामुळे दुर्लक्ष करून खरेदी केली.
सरकारने बॅंकांना भांडवली मदत केली आहे. मार्च महिन्यामध्ये वाहन विक्री वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली. या कारणामुळे बॅंका, वित्तीय संस्था आणि वाहन कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली असल्याचे दिसून आले.

बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 1.05 टक्‍क्‍यांनी म्हणजे 520 अंकांनी वाढून 50,029 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 176 अंकांनी वाढून 14,867 अंकांवर बंद झाला.

खरेदीचा जोर बऱ्यापैकी असल्यामुळे सेन्सेक्‍स संबंधातील 30 पैकी 25 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. इंडसइंड बॅंक, कोटक बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, सन फार्मा, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांनी आज तेजीचे नेतृत्व केले. तर नेस्ले एचयुएल, एचडीएफसी बॅंक, टीसीस, टायटन या कंपन्या पीछाडीवर राहिल्या.

अमेरिकेने पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी मोठी गुंतवणूक योजना जाहीर केल्यामुळे जागतिक बाजारात तेजीचे वातावरण होते. परकीय गुंतवणूकदारांनी बुधवारी 1,685 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. सध्या निर्देशांक वाढत असले तरीही करोना व्हायरसच्या रुग्णाच्या संख्येकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. पुढील आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. त्या पतधोरणाच्या आधारावर गुंतवणूकदाराला निर्णय घेण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.