मुंबई – मी सागर बंगल्यासमोर येऊन प्रेस घेऊ शकतो. तुम्ही तुमची कटकारस्थाने थांबवा आम्ही तुमच्यावरचे हल्ले थांबवू, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्र्यांना ऑफर दिली आहे. राऊत यांचा भोंगा पहाटे-पहाटे वाजत असतो. ते आपल्याला घाबरतात म्हणून रोज त्यांची टीका सुरू असते, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांना लगावला. यावर संजय राऊत यांनीही त्याच भाषेत शुक्रवारी प्रत्युत्तर दिले आहे.
या देशात लोकशाही आहे, स्वातंत्र्य आहे. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतोय. मी माझ्या पक्षाचा मुख्य प्रवक्ता आहे, सामनाचा संपादक आहे. त्यात यांच्या पोटात दुखण्यासारखे काय? याचा अर्थ असा आहे की ते आम्हाला घाबरत आहेत. त्यांनी खरी शिवसेना जरी निवडणुक आयोगाकडून दुसऱ्यांना दिली असेली तरी, खरी शिवसेना आमच्यात आहे, असेही राऊत यांनी पुढे बोलताना म्हटले आहे.
विरोधकांची मोट
राऊत पुढे म्हणाले, विरोधक एकत्र येणार. कॉंग्रेसने सगळ्या विरोधकांना एकत्र येऊन मोट बांधण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. राहुल गांधी यांच्या या योजनेचे आम्ही स्वागत करतो. नितीश कुमार, तेजस्वी यादव राहुल गांधींना भेटले. त्यांनी अरविंद केजरीवाल यांची देखील भेट घेतली. काल राहुल गांधी आणि शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे यांची देखील भेट झाली. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील “सिल्व्हर ओक’ या त्यांच्या निवासस्थानी भेट झाली. हे चांगले संकेत आहेत.