रजनीकांत यांनी वाढवला ‘सस्पेन्स’

चेन्नई  – दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी तूर्त राजकारणात सक्रिय व्हायचे की नाही याविषयीचा निर्णय पुढे ढकलला. शक्‍य तितक्‍या लवकर निर्णय जाहीर करू, असे म्हणत त्यांनी सस्पेन्स आणखी वाढवला.

रजनी यांनी काही काळापूर्वी तामीळनाडूच्या राजकारणात उडी घेण्याचे ठरवले. त्यासाठीची तयारी म्हणून त्यांनी रजनी मक्कल मंदरम या संघटनेची स्थापना केली. मात्र, राजकारण प्रवेशाबाबत रजनी यांच्या गोटात फारशा हालचाली दिसल्या नाहीत. अशात त्यांनी मागील महिन्यात केलेले एक वक्तव्य त्यांचे समर्थक आणि चाहत्यांचा भ्रमनिरास करणारे ठरले.

माझ्यावर 2016 मध्ये परदेशात मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे आणि करोना संकटामुळे राजकारणात सक्रिय होऊन अधिक दगदग न करण्याचा सल्ला मला डॉक्‍टरांनी दिला, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे राजकारणात उडी घेण्यास रजनी उत्सुक नसल्याचे चित्र निर्माण झाले. आता तामीळनाडूतील विधानसभा निवडणूक अवघ्या पाच-सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे.

त्यामुळे रजनी काय करणार याविषयी चर्चांना तोंड फुटले आहे. त्या चर्चांना पूर्णविराम देण्याच्या उद्देशातून रजनी यांनी सोमवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्या बैठकीनंतर ते निर्णय जाहीर करतील, असे वृत्त पुढे आले. त्या बैठकीत रजनी यांनी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. मात्र, लगेचच निर्णय जाहीर करण्याचे त्यांनी टाळले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.