शेतकऱ्यांच्या ‘त्या’ धमकीने सरकारचे धाबे दणाणले; भाजपच्या वरिष्ठांची तातडीची बैठक

नवी दिल्ली – देशाच्या राजधानीत जमलेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीची चौफेर कोंडी करण्याची धमकी दिल्यामुळे केंद्र सरकारचे धाबे दणाणले आहे. यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्याशी दीर्घ चर्चा केली. कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेही या बैठकीला उपस्थित होते.

देशाची राजधानी दिल्लीच्या बॉर्डरवर अंगदप्रमाणे पाय गाडून बसलेले शेतकरी आरपारच्या मूडमध्ये आहेत. केंद्र सरकार नवीन कृषी कायदा रद्द करीत नाही तोपर्यंत माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब आणि हरयाणातील लाखो शेतकरी बॉर्डरवर जमले आहे.

महत्वाचे म्हणजे, सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही तर दिल्लीची चौफेर कोंडी केल्याशिवाय राहणार नाही, असा ताकीदवजा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. एवढेच नव्हे तर, चर्चा करण्याचा शहा यांचा प्रस्ताव सुध्दा त्यांनी धुडकावून लावला. शेतकऱ्यांनी सर्व बॉर्डरवर आंदोलन केले तर कुणालाही येता जाता येणार नाही.

यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी रविवारी रात्री विस्तृत चर्चा केली. कृषी मंत्री नरेंद्र तोमर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सुध्दा या बैठकीला उपस्थित होते. ही बैठक दोन तास चालली.

दुसरीकडे, शेतकरी संघटनांनी दिल्लीच्या उत्तर सिंघु बॉर्डरवर एक बैठक घेतली. या बॉर्डरहून हरयाणा, चंदिगड, हिमाचल प्रदेश आणि पंजाबला जाणारा हायवे जातो. याशिवाय, दिल्लीत प्रवेश करण्याचे पाच मार्ग बंद करण्याचा निर्णय सुध्दा या बैठकीत घेण्यात आला. बिंदु-सोनीपत, रोहतक, जयपूर, गाजियाबाद-हापुड आणि मथुरा हे ते पाच रस्ते आहेत.

शेतकरी दिल्लीच्या तीन-चार बॉर्डरवर जमले आहेत. आपल्याला रामलीला मैदानावर प्रवेश करू द्यावा यासाठी दिल्लीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, दिल्ली आणि हरयाणाचे पोलिस शेतकऱ्यांना अडविण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांनी रविवारी बैठकीत सरकारच्या अटी मानण्यास स्पष्ट नकार देण्याचा निर्णय घेतला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.